नाशिक : कानठळ्या बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

हॉर्न,www.pudhari.news

नाशिक : गौरव अहिरे 

कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न बसवून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दंडात्मक कारवाई केली आहे. आरटीओने गेल्या तीन वर्षांत ५६९ चालकांवर कारवाई करीत ३ लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. ही कारवाई नियमित होणार असल्याचा इशारा आरटीओने दिला आहे.

वाहनांच्या मूळ रचनेत बदल करणाऱ्या हौशी चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच काही वाहनचालक कानठळ्या बसवणारे हॉर्न व सायलेन्सर बसवत आहेत. त्यामुळे कर्णकर्कश आवाज झाल्यास इतर नागरिक, वाहनचालक गोंधळतात किंवा घाबरतात. अनेकदा मोठ्या आवाजामुळे चिडचिडेपणा वाढतो किंवा लक्ष विचलित झाल्यास अपघातांची शक्यताही वाढते. तरीदेखील याची काळजी बेशिस्त वाहनचालक घेत नसल्याचे वारंवार दिसते. कर्णकर्कश हाॅर्नमुळे ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ हाेते. या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था – कार्यकर्ते पोलिस व आरटीओकडे तक्रारी करतात. त्यानुसार पोलिस व आरटीओ अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत असतात. त्यात वाहनांचे हॉर्न व सायलेन्सरमध्ये फेरफार केलेले आढळल्यास किंवा आवाज मोठा असल्यास वाहने जप्त केली जातात. जप्त वाहने आरटीओकडे जमा करून त्या वाहनांची तपासणी केली जाते. तपासणीत वाहनांच्या हॉर्न, सायलेन्सरमध्ये बदल केल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ३ हजार ६४० वाहने तपासण्यात आली. त्यात ५६९ वाहनांना कर्णकर्कश हाॅर्न बसविल्याचे आढळले. त्यामुळे या चालकांवर कारवाई झाली असून त्यापैकी ३०३ प्रकरणे निकाली काढून संबंधित वाहनचालकांकडून ३ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई झालेल्या वाहनचालक व मालकांनी वाहनांना रडणारे बाळ, भुंकणारे श्वान, अचानक ब्रेक लागल्यानंतर वाहनाचा आवाज करणारे, प्रेशर व सायरनचेही हाॅर्न बसविल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली.

हाॅर्नबाबतचा कायदा…

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे नियम ११९ मधील तरतुदीनुसार वाहनांना मार्गदर्शक तत्त्वानुसार हाॅर्न बसविणे आवश्यक आहे. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती निवारकासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांना सायरन बसवता येत नाही. विचित्र आवाज करणारे, हायड्रोलिक प्रेशर हाॅर्न, वाहन मागे घेतानाचे विविध आवाजातील हाॅर्न बसविण्यास बंदी आहे. या कायद्याचा भंग केल्यास वाहनचालक, मालकाविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यात दंडाची शिक्षा होऊ शकते.

बुलेटचे फटाके आणि स्विचची कमाल

फटाके फोडणाऱ्या बुलेटविरोधात सुरू असलेली कारवाईही स्वागतास पात्र ठरली आहे. या फटाक्यांसह सुपर बाइक्सचे आवाज नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. प्रेशर हॉर्न बसविताना काही गॅरेजचालकांनी एक फंडा तयार केला असून पेट्रोल कॉकच्याजवळ एक स्विच बसविण्याची युक्ती शोधून काढली आहे. हा स्विच ऑन केला, तर प्रेशर हॉर्न वाजतात आणि तो बंद केला, तर रेग्युलर हॉर्न वाजतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांना संशय आला, तरी केवळ स्विच ऑफ केल्यामुळे प्रेशर हॉर्न वाजत नाही आणि नियमाचा भंग करणारी व्यक्ती सहज निघून जाते.

वाहनांवरील कारवाई

सन —-       तपासलेली —- दाेषी वाहने —- निकाली प्रकरणे —- तडजाेड शुल्क

२०१९-२०      १५०३ —-           १८९ —-                १०४ —-                  १,०४,०००

२०२०-२१ –    ५२४ —-             ७२ —-                   ४७ —-                     ४७,०००

२०२१-२२       ७०१ —-            १५६ —-                 ७८ —-                      ७८,०००

२०२२-२३      ९१२ —-             १५२ —-                 ७४ —-                       74000

हेही वाचा :

 

The post नाशिक : कानठळ्या बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.