नाशिक : कामगार कल्याणच्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ

कामगार कल्याण नाटक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय नाशिक प्राथमिक नाट्य महोत्सवाचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि.28) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पाडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर अभिनेता प्रकाश धोत्रे, अध्यक्ष करन्सी नोटप्रेसचे बोलेवार बाबू, निर्माते संजय पाटील, अ‍ॅड. आचार्य वैद्य, नाट्य परिषदेचे कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. महाराष्ट्र कामगार कल्याणच्या 68व्या नाट्यमहोत्सवात बुधवारी (दि.28)पहिले नाटक राजेश शर्मा दिग्दर्शित व गिरीश जोशी लिखित ‘फायनल ड्राफ्ट’ हे सादर करण्यात आले.

एका छोट्या गावातून एक मुलगी लेखिका होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत येते. शहरात आल्यावर एका महाविद्यालयात ती लेखनासाठी प्रवेश घेते. तेथील प्राध्यापकांनी शिकविलेले तिला कळत नाही. तिच्यात सुधारणा व्हावी म्हणून लेखन सुधारावे यासाठी प्राध्यापक तिला घरी शिकायला बोलवतात. तिला प्राध्यापकांनी शिकवलेले काही कळत नाही आणि प्राध्यापकांची चिडचिड सुरू होते. आपण शिकवण्यात कमी पडतो, अशी भावना त्यांच्यात निर्माण होते. शिकवणी सुरू असताना प्राध्यापकांना सतत पत्नीचे फोन येत असतात. यामुळे त्यांच्या नात्यात होणार्‍या ताणतणावात मुलीच्या मनात प्राध्यापकांविषयी आपुलकी निर्माण होते. ज्या प्राध्यापकांचे लेखन बघून तिला लिहावे वाटत असते. परंतु बदलत्या लेखनशैलीमुळे प्राध्यापकांची लेखनशैली बघून ती हतबल होते. त्यातून त्यांच्यात एक अनामिक नाते तयार होते. त्याचे पुढे काय होते, ते ‘फायनल ड्राफ्ट’ या नाटकातून मांडण्यात आले आहे. रंगभूषा माणिक कानडे, नेपथ्य शैलेंद्र गौतम, संगीत मधुरा तरटे, प्रकाशयोजना विनोद राठोड, वेशभूषा सुरेखा शर्मा यांचे होते, तर माधुरी पाटील व राजेश शर्मा यांनी भूमिका साकार केल्या होत्या. भावना बच्छाव यांनी प्रास्ताविक, तर शशिकांत पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश पाटील यांनी आभार मानले.

आजचे नाटक : “फक्त चहा”, दिग्दर्शक : राजेश शर्मा, लेखक : गिरीश जोशी, सादरकर्ते : कामगार कल्याण भवन सातपूर वसाहत.

हेही वाचा:

The post नाशिक : कामगार कल्याणच्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ appeared first on पुढारी.