नाशिक : कामगार नेत्याच्या मुलाचा विदेशात मृत्यू

www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
कझाकिस्तान येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या येथील प्रेस कामगार नेत्याच्या मुलाचा इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, कामगार आणि सातपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय (आयएसपी) प्रेस कामगार नेते, वर्क्स कमिटीचे सदस्य डॉ. चंद्रकांत हिंगमिरे यांचा मुलगा ओंकार चंद्रकांत हिंगमिरे रशिया देशानजीक असलेल्या कझाकिस्तान देश या ठिकाणी एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. कॉलेजजवळच एका इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर नाशिकच्या मित्रांसह तो एकत्र राहत होता. ओंकार 26 एप्रिलला लागलेल्या चौथ्या वर्षाच्या निकालात प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला होता. काही दिवसांत सुट्टी लागणार असल्याने 7 जून रोजी तो नाशिक येथे घरी येणार होता. त्यासाठीचे विमानाचे तिकीट बुक केले होते. मात्र, नियतीने त्याच्यावर घाला घातला आणि 5 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास सहाव्या मजल्यावरून पडून ओंकारचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रेस कामगार नेते यांनी डॉ. हिंगमिरे यांच्या निवासस्थानी धाव घेतली, कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ओंकार यांचा मृतदेह आणण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला. खा. गोडसे यांनी कझाकिस्तानमधील राजदूताबरोबर पत्रव्यवहार केल्याचे समजते. डॉ. हिंगमिरे यांचा मोठा मुलगा यश हा लंडन येथे एमएसचे शिक्षण घेत असून, भावाच्या निधनाचे वृत्त समजताच त्याने नाशिककडे धाव घेतली.

हेही वाचा:

The post नाशिक : कामगार नेत्याच्या मुलाचा विदेशात मृत्यू appeared first on पुढारी.