नाशिक : कारचालकाचे अपहरण करून लुटणारे तिघे गजाआड

arrested,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रिक्षाला कट लागल्याची कुरापत काढून कारचालकास धमकावत त्याचे अपहरण करून ऑनलाइन स्वरूपात ४५ हजार रुपये आणि चार हजार रुपये रोख रकमेसह मोबाइल, अंगठी व घड्याळ लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. या संशयितांनी शनिवारी (दि. ६) मध्यरात्री इंदिरानगर बोगद्याजवळ लूटमार केली होती. संशयितांकडून ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

युनूस ऊर्फ अण्णा अयुब शहा (२४) , वसीम बशीर सय्यद (३१) आणि गुलाम सादिक मोंढे (२७, सर्व रा. वडाळागाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

विमा कंपनीत कार्यरत असलेले हर्षल सुभाष पारोळकर हे एमएच १५ एफटी ७१७६ क्रमांकाच्या कारने इंदिरानगर बोगदा येथून मध्यरात्री जात होते. त्यावेळी एमएच १५ झेड ९८४७ क्रमांकाच्या रिक्षामधील संशयितांनी रिक्षास कट लागल्याचा वाद घातला. पारोळकर यांना धमकावून त्यांच्या कारमधून अपहरण केले. संशयितांनी विल्होळीकडे नेत पारोळकरांच्या खिशातील चार हजार रुपये, मोबाइल, मोत्याची अंगठी, घड्याळ काढून घेतले. पारोळकरांना धमकावून गुगल पे वरून ४५ हजार रुपये घेतले. त्यानंतर संशयित पसार झाले. पारोळकरांनी मुंबईनाका पोलिस ठाणे गाठून घटना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यात तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तिघे संशयित पकडण्यात आले.

—–

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. पारोळकर यांच्या बँक व्यवहारांची माहिती घेत व परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयितांची ओळख पटवण्यात आली. गुन्हे युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयितांचा ठावठिकाणा समजला. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी सापळा रचण्यात आला. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, अंमलदार रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, आप्पा पानवळ यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

रोख स्वरूपात पैसे बदलले

संशयितांनी पारोळकर यांच्याकडून गुगल पे वरून घेतलेले पैसे संशयितांनी पेट्रोलपंपावरून रोख स्वरूपात घेतले. दवाखान्यात नातेवाइक दाखल असून, उपचारासाठी तातडीने पैसे हवे आहेत, असे सांगून संशयितांनी पेट्रोलपंप चालकाकस ऑनलाइन पैसे टाकून रोख स्वरूपात पैसे स्वीकारले. याच व्यवहाराच्या मदतीने पोलिसांनी तिघांचा माग काढला.

The post नाशिक : कारचालकाचे अपहरण करून लुटणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.