नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारणार १२० किलोमीटरचे इनर रिंगरोड

इनर रिंग रोड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल १२० किलोमीटरचे इनर रिंगरोड उभारले जाणार असून, यासाठी लवकरच शिखर समिती गठीत केली जाणार आहे. यासाठी प्रारंभी भूसंपादनही केले जाणार असून, सर्वेक्षणाअंती याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नगररचना संचालक हर्षल बाविस्कर यांनी दिली.

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कनेक्टिव्हिटी बळकट असावी, यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सेवा सुविधांचे वर्गीकरण करताना त्यातील त्रुटींचा अभ्यास करून त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सिंहस्थात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न असून, यातून नाशिककरांची सुटका करण्यासाठी नव्या इनर रिंगरोड साकारले जाणार आहेत. यासाठी महापालिकेने सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज बांधला आहे. मध्यंतरी महापालिका आयुक्तांनी शासनाला पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सिंहस्थासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासोबतच विकासकामे, त्यासाठी लागणारा निधी याबाबतचा सविस्तर अहवाल राज्याच्या शिखर समितीसमोर सादर केला जाणार आहे.

दरम्यान, शहराच्या अंतर्गत रस्त्यांमध्ये अंतर्गत, मध्य व बाह्य रिंगरोड अशा तीन स्तरांवर रिंगरोड बनविले जाणार आहेत. त्यांच्या परस्परांना जोडणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ जोडण्याच्या कामाचे सध्या नियोजन सुरू आहे. सुमारे १२० किलोमीटरचा हा रिंगरोड असून, भूसंपादनासाठी तसेच विस्तारासाठी सुमारे एक हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. या अंतर्गत शहरातील छोट्या रस्त्यांचे ‘फुलविड्थ’ रस्त्यांमध्ये विस्तारीकरण केले जाणार आहे. सिंहस्थात शहरात दाखल होणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारणार १२० किलोमीटरचे इनर रिंगरोड appeared first on पुढारी.