नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज घमासान

बाजार समितीचा आखाडा www.pudhari.news

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेल्या व संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील १2 बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी शुक्रवारी (दि. 28) मतदान होत आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव आणि येवला या बाजार समित्यांचे निकाल जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

जिल्ह्यातील मतदान होत असलेल्या नाशिक बाजार समितीसह १३ बाजार समित्यांमध्ये सुरगाणा, देवळा, घोटी, पिंपळगाव बसवंत, कळवण, येवला, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी, चांदवड, मालेगाव आणि लासलगाव यांचा समावेश आहे. फक्त मनमाडला ३० एप्रिलला मतदान होणार आहे. नाशिक बाजार समितीमध्ये माजी खासदार देवीदास पिंगळे आणि चुंभळे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, मनमाड, लासलगाव आणि येवला या पाच बाजार समित्यांचे निकाल जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

निफाड तालुक्यातील 69 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या पिंपळगाव बाजार समितीसाठी पिंपळगाव बसवंत व मांजरगाव या दोन ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. पिंपळगाव बसवंत येथील उंबरखेड रोडवरील जनता विद्यालयात सात बूथ, तर मांजरगाव येथे तीन बूथ अशा एकूण 10 बूथमध्ये सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

आमदार दिलीप बनकर यांचा शेतकरी विकास पॅनल, तर आमदार अनिल कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे याशिवाय चार, पाच अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 10-12 दिवसांत 69 गावे अक्षरशः पिंजून काढली असून, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायतीचे सदस्य, व्यापारी सभासद व हमाल मापारी सभासद असे एकूण 2,667 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

१०० मतदान केंद्रांमध्ये मतदान

जिल्ह्यात नाशिकसह सुमारे १०० मतदान केंद्रांमध्ये आज मतदान होणार आहे. यात नाशिक तालुक्यात १३ मतदान केंद्रे आहेत. पिंपळगाव बसवंत येथे १० केंद्रे, घोटीमध्ये १२, देवळ्यात ३, कळवणमध्ये ६, दिंडोरीमध्ये ७, चांदवडमध्ये ७, येवल्यात ७, नांदगावमध्ये ६, सिन्नरमध्ये १६, मालेगावमध्ये १२, लासलगावमध्ये ७, तर मनमाडमध्ये ४ मतदान केंद्रे आहेत. सुरगाणा बाजार समिती निवडणूक अगोदरच बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित १३ समित्यांपैकी मनमाडचा अपवाद वगळता, इतर सर्व तालुक्यांत शुक्रवारी (दि. २८) मतदान होईल. यातील नाशिक, पिंपळगाव, चांदवड, येवला, मालेगाव आणि लासलगाव येथे शनिवारी (दि. २९) निकाल लागेल. तर घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, सिन्नर येथे शुक्रवारी लगेचच मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान होऊन १ मे रोजी मतमोजणी होईल.

हेही वाचा :

The post नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज घमासान appeared first on पुढारी.