Site icon

नाशिक : कॅट्स’च्या हवाई क्षेत्रात ड्रोनच्या घिरट्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपनगर येथील गांधीनगर परिसरातील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात गुरुवारी (दि.२५) रात्री दहाच्या सुमारास ड्रोनने घिरट्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅटचा परिसर नो ड्रोन फ्लाय झोन म्हणून मे महिन्यात जाहिर केला आहे. त्यानंतर हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ड्रोन उडवणाऱ्यासह ड्रोनचा शोध घेण्यात येत असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देश विदेशात ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आल्याने सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून शहर पोलिस आयुक्तालयाने १३ मे रोजी अधिसुचना काढून शहरातील १३ ठिकाणी नो ड्रोन फ्लाय झोन जाहिर केले आहेत. त्यात कॅट्सच्या परिसराचाही समावेश आहे. त्यानुसार या १३ प्रतिबंधित ठिकाणी कोणालाही ड्रोन उडवता येत नाही. मात्र, गुरुवारी (दि.२५) रात्री दहाच्या सुमारास कॅट्सच्या रडारवर हवाई क्षेत्रात ड्रोन उडत असल्याची माहिती समजली. अंदाजे ८०० मीटर उंचीवर हे ड्रोन घिरट्या घालत होते. त्यानुसार तेथील जवानांनी याची माहिती बेस सिक्युरीटी ऑफिसर लेफ्टनंट कर्नल व्ही. रावत यांना कळवून फायरींग करून ड्रोन पाडण्याची परवानगी मागितली. याच कालावधीत ड्रोन तेथून काही क्षणात दिसेनासे झाले. मात्र पुन्हा ड्रोन आढळून आल्यास ते पाडण्याचे आदेश रावत यांनी जवानांना दिले आहेत. सुमारे दोन ते तीन मिनिटे हे ड्रोन प्रतिबंधीत क्षेत्रात उडत होते. त्यामुळे वरिष्ठांच्या सुचनेनुसार मनदिपसिंग ईश्वर सिंग (३५, रा. मिलीटरी क्वाटर्स, गांधी नगर) यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठून अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कॅट्स’च्या हवाई क्षेत्रात ड्रोनच्या घिरट्या appeared first on पुढारी.

Exit mobile version