नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र

नाना पटोले इन नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रात भाजपप्रणीत मोदी सरकार स्थापन झाल्यापासून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. असंविधानिक मार्गाचा वापर करून लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत अराजकता माजविली जात आहे. केंद्र सरकारकडून लोकशाहीचे तसे भारतीय संविधानाचे वारंवार वस्त्रहरण केले जात असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.

शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे आयोजित शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मेळावा व आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, प्रभारी बि—जकिशोर दत्त, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी नगरसेवक शाहू खैरे, राहुल दिवे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, माजी आमदार अनिल आहेर, स्वप्निल पाटील, ज्ञानेश्वर काळे, संदीप गुळवे, संपत सकाळे उपस्थित होते.

भारतात कोरोना येण्यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सरकारला सतर्क केले होते. मात्र, पंतप्रधानाच्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे कोरोना भारतात आला. त्यालाही मुस्लीम बांधवांच्या दिल्लीतील जागतिक अधिवेशनाला जबाबदार धरण्यात आले. जगात रेमडिसिव्हीर इंजेक्शनला बंदी असतानाही पंतप्रधानांनी गुजरातमधील आपल्या मित्राचा साठा संपविण्यासाठी परवानगी दिली, तर राज्यातील तत्कालीन दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी त्यावेळी रेमडिसिव्हीरचा काळाबाजार करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्याचे आमदार पटोले यांनी सांगितले.

लोकांमध्ये जाऊन धीर द्या
केंद्राकडून मतांसाठी सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या व्यक्तीच्या जातीचा उल्लेख केला जातो. केंद्र सरकार हे शेतकरी तसेच सर्वसामान्यांविरोधी आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन देशातील सद्यस्थिती मांडावी. लोकांमध्ये दुखी-कष्टी पांडुरंग शोधून त्याला धीर देण्याचे आवाहन पटोले यांनी केले.

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून बळीराजाला लुटण्याचा धंदा

जनतेतील विठ्ठल शोधा : विधिमंडळ नेते थोरात
आगामी सहा महिन्यांमध्ये लोकसभा वगळता, इतर निवडणुका होणार आहेत. या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत होणार्‍या पदयात्रेत मिळणार आहे. ही यात्रा एक प्रकारची दिंडीच आहे. भाजप सरकारच्या कारभाराचा हिशेेब मांडतानाच यात्रेत जनतेमधील विठ्ठल शोधण्याचे आवाहन काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

हेही वाचा :

The post नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र appeared first on पुढारी.