नाशिक : कोट्यवधींच्या उलाढालीची बाजाराने उभारली गुढी

सोन्याला झळाळी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत अपार उत्साह बघावयास मिळाला. सोने-चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ मानल्या जात असलेल्या या दिवशी नाशिककरांनी दरवाढीनंतरही खरेदीचा आनंद घेतला. चारचाकी, दुचाकी, घरे, इलेक्ट्राॅनिक वस्तू तसेच फर्निचर खरेदीचीही नाशिककरांनी मुहूर्तमेढ रोवल्याचे दिसून आले. कोरोनानंतर बाजारात होणाऱ्या उलाढालीने अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येऊ लागल्याचे दिसू लागले आहे.

गुढीपाडवा खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्याने विविध कंपन्या व विक्रेत्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचा नाशिककरांनी चांगलाच लाभ घेतल्याचे दिसून आले. सोने-चांदी खरेदीसाठी सायंकाळनंतर नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांत अचानकच सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याने, त्याचा खरेदीवर परिणाम होईल असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, ग्राहकांचा प्रतिसाद बघता मोठी उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. विशेषत: चोख सोने खरेदीला अधिक प्राधान्य दिले गेले. गुंतवणूक म्हणूनदेखील अनेकांनी सोने-चांदी खरेदी केली.

वाहन बाजारातही मोठी तेजी दिसून आली. अनेक चारचाकी वाहनांना वेटिंग असल्याने, ग्राहकांनी अगोदरच बुकिंग केल्या होत्या. अंदाजे ४५० पेक्षा अधिक कारची बुकिंग आणि डीलिव्हरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अडीच हजारांपेक्षा अधिक दुचाकींची विक्री झाली. घरे विक्रीदेखील समाधानकारक झाल्याने रिअल इस्टेटला बूस्ट मिळाला. बांधकाम व्यावसायिकांच्या मते, शहर व परिसरात ४०० ते ४५० फ्लॅट, रो-हाऊसेस तसेच बंगलोजची विक्री झाली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात बुकिंगसाठी ग्राहकांची झुंबड पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर मोबाइल शॉपी, इलेक्ट्रॉनिक मॉल्समध्ये अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल, मायक्रोव्हेव, ओव्हन गुढीपाढव्याच्या मुहूर्तावरच घरी नेण्याचा ग्राहकांचा कल दिसून आला.

कार-४०० ते ४५०

दुचाकी – २५००

घरे – ४५० ते ५००

सोने-चांदी – १०० कोटी

इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर – ७० कोटी

(वरील आकडेवारी विक्रेत्यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे…)

किरकोळ बाजारात तेजी

गुढीपाडव्याचा मुहूर्त बाजारात तेजी निर्माण करणारा ठरला. किरकोळ बाजारातदेखील मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे दिसून आले. फळबाजारात सफरचंद, द्राक्षे, पेरू, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी यास मोठी मागणी होती. पूजेच्या साहित्यातही मोठी उलाढाल झाली. बांबूची काठी १०० ते १५० रुपयांप्रमाणे विकली गेली. भगव्या पताका, झेंड्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पूजन केले जात असल्याने, त्याबाबतचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आले होते.

सकाळच्या सत्रात ग्राहकांचा फारसा कल नव्हता. मात्र, सायंकाळनंतर ग्राहकांची गर्दी वाढली. दरवाढीचा काहीसा परिणाम झाला. मात्र, खरेदीचा उत्साह कायम होता. पुढील दोन-तीन दिवसांत दर स्थिर झाल्यानंतर पुन्हा ग्राहकांचा कल पूर्ववत होईल.

– गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

हेही वाचा : 

The post नाशिक : कोट्यवधींच्या उलाढालीची बाजाराने उभारली गुढी appeared first on पुढारी.