नाशिक : कोब्राचा फुत्कार…. आणि भला मोठा फणा पाहून दुचाकीचालकाची उडाली भंबेरी

नागोबा www.pudhari.news

येवला : पुढारी वृत्तसेवा
धावत्या मोटरसायकलमध्ये नागोबाने एन्ट्री करत फुत्कार काढल्याने दुचाकीचालकाची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र, सर्पमित्राने प्रसंगावधात होत विषारी इंडियन कोब्रा नागास जिवंत सुखरुप दुचाकीतून बाजुला काढले. यावेळी नागाला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

शनिवारी, दि. 1 रोजी दुपारच्या 2 च्या दरम्यान येवला शहरातील उद्योजक विशाल देटके हे पल्सर मोटरसायकल घेऊन कोटमगावच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान अचानकपणे गंगा दरवाजा भागात एचडीएफसी बँकेच्या समोर त्यांना दुचाकीच्या इंडिकेटरजवळ नागाच्या फुत्कारण्याचा आवाज आला आणि धावत्या मोटरसायकलवर नागोबाने भला मोठा फणा वर काढला…. नागचा भितीदायक फणा बघून विशाल देटके यांची भंबेरीच उडाली. प्रसंगावधान, राखून त्यांनी मोटरसायकलचा वेग कमी करून धावत्या मोटरसायकलवरून उडी घेत जीव वाचवला.  चालत्या वाहनावरुन त्यांनी अचानक उडी घेतल्याचा प्रकार उपस्थित नागरिकांच्या लक्षात आला नाही. त्यानंतर विशाल यांनी आपबीती सांगत आरडाओरडा केल्यानंतर झालेला प्रकार लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ येवल्यातील सर्पमित्र दीपक सोनवणे यांना घटनास्थळी बोलविले. सर्पमित्र सोनवणे यांनी अत्यंत शिताफीने विषारी इंडियन कोब्रा नागास मोटरसायकलच्या मधून जिवंत सुखरुप बाजूला करत प्लास्टिक भरणीत कैद करत जंगलात सोडले.

हेही वाचा:

The post नाशिक : कोब्राचा फुत्कार.... आणि भला मोठा फणा पाहून दुचाकीचालकाची उडाली भंबेरी appeared first on पुढारी.