नाशिक : कोरोनासंदर्भात सज्ज राहण्याचे निर्देश

कोरोना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोना आणि इन्फ्लुएंझा या साथरोगांचे वाढते रुग्ण पाहता आगामी काळात अधिक सज्ज व दक्ष राहण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने दिले आहेत. वैद्यकीय खात्याचे सचिव नवीन सोना यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी या बैठकीला हजेरी लावत नाशिक शहरातील कोरोनाचा आढावा सादर केला. सध्या नाशिक मनपा हद्दीत एकूण १९ पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यापैकी १३ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. २७ मार्च रोजी मनपाने शहरातील एकूण १८० नागरिकांचे नमुने घेतले. त्यापैकी मनपा हद्दीतील १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, १६१ नागरिकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १०.५६ टक्के इतका आहे. यामुळे सर्वच ठिकाणी रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता येत्या काळात दक्ष राहून बेड तसेच रुग्णालयासह यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश सचिव नवीन सोना यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नाशिक मनपा प्रशासनाकडे नवीन बिटको रुग्णालय आणि डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी व्यवस्था होऊ शकते. कारण यापूर्वीदेखील या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि त्यानंतरच्या लाटांमध्ये रुग्णांसाठी बेड तसेच सर्व प्रकारची यंत्रणा मनपाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. तिसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने संबंधित दोन्ही रुग्णालयांमध्ये आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवेसाठी बेड उपलब्ध करून देण्यात आले. सध्या झाकिर हुसेन रुग्णालयात प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी काही बेड राखीव ठेवले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : कोरोनासंदर्भात सज्ज राहण्याचे निर्देश appeared first on पुढारी.