नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग

विनयभंग

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात टोळक्याने दोन बहिणींचा विनयभंग करीत त्यांच्या घराचा व गाळ्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित धनराज बंब व इतर तीन-चार संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली. संशयितांनी शनिवारी (दि. १) दुपारी 3.30 च्या सुमारास घराचे व दुकानाचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करीत या बहिणींचा विनयभंग केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

कुरापत काढून मारहाण

नाशिक : उपनगर येथील कॅनॉल रोडलगत इंदिरानगर झाेपडपट्टी परिसरात युवकाला मारहाण करीत गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी समीर संजय दोंदे (१८, रा. कॅनॉल रोड) याने उपनगर पोलिस ठाण्यात संशयित आदित्य बाबासाहेब भदरगे (रा. कॅनॉल रोड) याच्याविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली. संशयिताने कुरापत काढून हत्याराने वार करीत दुखापत केली. या प्रकरणी उपनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दुचाकीतून साडेचार लाख लंपास

नाशिक : दुचाकीच्या डिकीतून चोरट्याने चार लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना लॅमरोड येथील शालिमार रेस्टॉरंट परिसरात घडली. या प्रकरणी गोपाल ईश्वरदास किश्नानी (४६, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. ३१) रात्री चोरट्याने दुचाकीच्या डिकीतून पैशांची बॅग लंपास केली. या प्रकरणी उपनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

शरणपूरला जुगाऱ्यांविरोधात कारवाई

नाशिक : शरणपूररोडवरील तिबेटीयन मार्केटच्या मागील भागात जुगार खेळणाऱ्यांवर सरकारवाडा पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी (दि. १) सायंकाळी ही कारवाई करीत पोलिसांनी पाच जुगाऱ्यांना पकडले. संशयितांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून ३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

तडीपार गुंड ताब्यात

नाशिक : शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असूनही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. वैभव रणजित लोखंडे (२०, रा. अंबड) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला एप्रिल २०२२ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीदेखील तो शनिवारी (दि. १) सायंकाळी शहरात फिरताना आढळला. त्याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अनिल देवीदास चव्हाण (२७, रा. अरिंगळे मळा, सिन्नर फाटा) यांचा मृत्यू झाला. ते दुचाकीवरून पळसे गावाकडून चेहेडीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि. १) सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

The post नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग appeared first on पुढारी.