नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

बनावट सोण्याची नाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूजा विशांत भोईर व विशांत विश्वास भोईर (दोघे रा. खडकपाडा, ठाणे) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, दोन संशयितांनी अतुल यांना जून २०२२ ते मे २०२३ या कालावधीत गंडा घातला. दोन संशयितांनी अतुल यांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यास प्रोत्साहित केले होते. जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी अतुल यांच्याकडून ३ कोटी ५ लाख ११ हजार १०० रुपये घेतले. मात्र पैसे किंवा नफाही दोघांनी परत केला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अतुल यांनी दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

‘टेलिग्राम’वरून बेरोजगाराची सव्वादोन लाखांची फसवणूक

टेलिग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या एकाला भामट्याने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १३ ते १४ एप्रिल दरम्यान, भामट्याने दोन लाख २३ हजार रुपयांचा गंडा घातला. पार्टटाइम जाॅब दिल्याचे भासवून भामट्याने तक्रारदाराकडून काम करवून घेतले. त्यानंतर कामांचा मोबदला देण्याऐवजी त्याने तक्रारदाराकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे घेत गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सिक्युरिटी प्रेसमधील नोकरीसाठी गमावले सहा लाख

नाशिक : नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून भामट्याने एकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेंद्र बबनराव जगताप (५१, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विजयकुमार मुंडावरे (रा. गोविंदनगर) याने जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुलीस नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून फसवले. त्यानंतर पैसे परत न करता किंवा नोकरी लावून न देता संशयिताने शिवीगाळ, दमदाटी केल्याचे जगताप यांनी सांगितले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा appeared first on पुढारी.