नाशिक : खराब द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा नाही!

draksh www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
सोमवारपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होण्याआधीच रविवारी संध्याकाळी अवकाळीने झोडपून काढल्याने द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. द्राक्षांवर चाचन फिरत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? हा प्रश्न आता भेडसावत असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना रविवारी संध्याकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने त्याचे परिणाम आता शेतपिकांवर दिसण्यास सुरुवात झाले आहे. द्राक्षबागेतील उभ्या पिकावरील द्राक्ष सडू लागल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली. निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, निफाड, उगाव, वनसगाव, सारोळे, खडक माळेगाव या गावांना सलग तीन-चार दिवस वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका द्राक्षपिकाला बसला आहे. टाकळी विंचूर येथील गोविंद टोपे या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याने तीन एकरांवर द्राक्षाची लागवड केली असून, आठ ते नऊ लाख रुपये खर्च करून द्राक्षाचे पीक घेतले होते. त्याचा व्यवहारही झाला होता. सोमवारी द्राक्ष काढून व्यापार्‍याला द्यायचे इतकेच कार्य बाकी असताना रविवारी अवकाळीने झोडपल्याने पीक हातचे गेले. आता तर द्राक्ष सडण्यास सुरुवात झाल्याने बागेची स्वच्छता करून द्राक्ष फेकण्यासाठीही हातात पैसा नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. अवकाळी पावसाने द्राक्ष सडण्यास सुरुवात झाल्याने द्राक्ष काढून फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा पुढील पीक कसे घ्यावे यासह अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिल्याने संपूर्ण कर्जमाफी करत पुढील पिकांसाठी शेतकर्‍यांना प्रत्येकी एक लाख रुपये रोख मदत करावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी शिवम हंडोरे यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : खराब द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा नाही! appeared first on पुढारी.