नाशिक : खामखेड्याची ‘मीरा’ सातासमुद्रापार जपतेय आध्यात्मिक परंपरा

मीरा www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
खामखेडा येथील माहेरवाशीण व सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास असलेल्या मीरा जाधव-शेवाळे व प्रभाकर जाधव यांनी आपल्या घरी गणरायाची 30 वर्षांपासून स्थापना करत आध्यात्मिक परंपरा सातासमुद्रापार जपत आहेत. खामखेड्याच्या लेकीचं ही भक्ती मातीशी जुळलेली नाळ अधोरेखित करत असून, पंचक्रोशीत हा कौतुकाचा विषय बनला आहे.

मागील 40 वर्षांपासून शेवाळे – जाधव परिवार दूरदेशी वास्तव्यास असून, त्याठिकाणी 30 वर्षांपासून गणरायाची स्थापना करत आहेत. गणेशाची आरास सजवण्यासाठी त्यांनी खास मातीचं लेणं सांगणारी लाकडी बैलगाडी नाशिकच्या कारागिरांकडून तयार करून घेतली आहे. त्यातून माती अन् भक्ती याचा सुरेख संगम यानिमित्ताने साधला आहे. गणेशोत्सवाला मुकलेला भावुक महाराष्ट्रीयन या प्रसन्न आरासाने मातीशी जोडले गेल्याचा भाव जाधव परिवाराकडे व्यक्त करतात. कसबे-सुकेणे येथील प्रभाकर जाधव हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून, मीरा या बँकेतून सेवानिवृत्त झाल्या. विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम या परिवारात दरवर्षी बघावयास मिळत असल्याने इकडे नातलगात कौतुकाने या उत्सवाची चर्चा करतात. यावर्षी महिन्याभरापूर्वी ते भारतात आले होते. भारतातून त्यांनी गणपती तसेच आरास देखावे, मंगळागौर, गवळणी, भातुकली आदी साहित्य खरेदी केले. आरास पाहण्यासाठी त्यांच्या सोसायटीतील अनेक मान्यवरांनी भेट दिल्या असून, मित्र-मैत्रिणींना आरतीचा मान दिला जातो.

परदेशात स्थायिक मराठी जण आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सण-उत्सव साजरे करतात. – मीरा जाधव, कॅलिफोर्निया, अमेरिका.

हेही वाचा:

The post नाशिक : खामखेड्याची ‘मीरा’ सातासमुद्रापार जपतेय आध्यात्मिक परंपरा appeared first on पुढारी.