नाशिक : खासगी गोदामावर छापा; दहा लाखांचा रेशनचा गहू, तांदूळ जप्त

तांदूळ निर्यात

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

कळवण-देवळा मार्गावरील एका खासगी गोदामातून सुमारे नऊ लाख ६२ हजार रुपयांचा रेशनचा १९.४० टन तांदूळ आणि १५.२० टन गव्हाचा साठा पोलिसांनी छापा टाकत जप्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरून १५ लाखांचा ट्रकही जप्त केला.

एका खासगी गोदामात रेशनचा साठा तांदूळ आणि गव्हाचा साठा खुल्या बाजारात विक्रीसाठी दडवून ठेवण्यात आल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिस पथकाने जोगेश्वरी नावाच्या खासगी गोदामावर रात्री छापा टाकला असता त्यांना तेथे रेशनचा १९.४० टन तांदूळ (५ लाख ८२ हजार रु.) तसेच १५.२० टन गहू (३ लाख ८० हजार रु.) आढळला. पोलिसांनी रेशनच्या धान्याचा अवैधरीत्या साठा केल्याप्रकरणी अजय मधुकर मालपुरे (वय ५२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळावरून पंधरा लाखांचा ट्रकही जप्त केला आहे. मालपुरे याच्याविरुद्ध कळवण पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे हे करत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : खासगी गोदामावर छापा; दहा लाखांचा रेशनचा गहू, तांदूळ जप्त appeared first on पुढारी.