नाशिक : खासगी चारचाकीत प्रवाशांची वाहतूक जोरात

चारचाकी www.pudhari.news

नाशिक : सतिश डोंगरे
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर आला असतानाही नाशिक ते मुंबईदरम्यान खासगी चारचाकींमध्ये सर्रासपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना कोंबून ही वाहतूक केली जात असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक ते मुंबई असा दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असून, यातील बहुतांश प्रवासी वेळेत पोहोचायचे म्हणून मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. नेमका याचाच फायदा घेऊन काही मंडळी आपल्या खासगी चारचाकीचा वापर करून प्रवाशांची ने-आण करतात. बर्‍याचशा चारचाकीधारकांना मुंबईत जायचे म्हणून ते प्रवाशांना घेऊन जातात. महामार्ग बसस्टॅण्डजवळील थांब्यावरून अशा प्रकारची सर्रासपणे वाहतूक केली जाते. खासगी चारचाकीवाले या ठिकाणी येऊन आपले वाहन उभे करतात. त्यानंतर काही एजंट मंडळी त्यांना प्रवासी आणून देतात. यावेळी प्रवाशांना अवाच्या सवा तिकीट आकारले जाते. यातूनच एजंटला 20 ते 25 टक्के कमिशन दिले जाते. कमिशन अधिक मिळवण्यासाठी एजंटकडून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबण्यावर भर दिला जातो. सध्या अशा प्रकारची बेकायदेशीर वाहतूक दररोज सुरू असून, परिवहन विभाग मात्र सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. दरम्यान, कुठलीही अप्रिय घटना घडण्याअगोदर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, शहरत परिसरात खासगी वाहनांतून होणार्‍या या प्रवासी वाहतुकीचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहे. विशेष म्हणजे एसटी बसने जाणार्‍या प्रवाशांना पळविण्याचे काम खासगी वाहनांचे एजंट करत असल्याचेही बसस्थानकांच्या आवारात नेहमी दिसून येते.

नाशिक ते मुंबई एअरपोर्टदरम्यान आम्ही या खासगी वाहनांचा पाठपुरावा केला. या वाहनांचे क्रमांकही आमच्याकडे आहेत. अत्यंत धोकादायक पद्धतीने ही वाहतूक केली जात असून, परिवहन विभागाने यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. एखादा अपघात झाल्यानंतर कारवाईचा फार्स करण्यास काही अर्थ नाही. – नितीन सातपुते, सामाजिक कार्यकर्ते.

पाचशे ते हजार रुपयांपर्यंत तिकीट
नाशिक ते मुंबई जाण्यासाठी पाचशे रुपयांपासून ते एक हजारापर्यंत तिकीट आकारले जाते. अनेक प्रवाशांना वेळेत मुंबई गाठायची असल्याने ते एक हजार रुपयांपर्यंत तिकीट देण्यास तयार होतात. त्या तुलनेत बस आणि रेल्वेची तिकिटे खूपच कमी असून, प्रवाशांची एक प्रकारे मोठी लूटच केली जाते.

पेट्रोलचा खर्च वाचविण्यासाठी…
काही खासगी चारचाकीधारक मुंबईत जायचे म्हणून पेट्रोलचा खर्च काढता यावा याकरिता प्रवाशांना घेऊन जातात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करताना वाहनात अत्यावश्यक सोयी सुविधाही नसतात. अशात हा संपूर्ण प्रवासच धोकादायक ठरत असून, प्रवाशांनी अशा वाहनांमधून प्रवास करणे टाळावे.

‘आरटीओ’चे दुर्लक्ष
शालेय वाहनांत पुरेशा सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. या वाहनांतील साधनांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने कित्येक वाहने खिळखिळी झाली आहेत. या वाहनांसह खासगी वाहनांची तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे धोकादायक वाहनांतून होणारा प्रवास शालेय विद्यार्थ्यांसह काही प्रवाशांच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : खासगी चारचाकीत प्रवाशांची वाहतूक जोरात appeared first on पुढारी.