नाशिक : खासगी वाहनांनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे : प्रादेशिक परिवहन अधिकारी

bus www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खासगी प्रवासी बस व वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी, अशा स्पष्ट शब्दांत प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्यांना तंबी दिली आहे. त्याचबरोबर कोणी अधिकचे दर आकारून लूट करीत असेल तर त्या प्रवाशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून अवाच्या सवा भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट केली जात असल्याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’मध्ये मंगळवारी (दि.३०) प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी बुधवारी (दि.३१) निश्चित दरानुसारच भाडे आकारावे, अशा प्रकारचे आदेश काढले आहेत. भाडे आकारणीबाबत २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विविध संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेण्यात आले आहेत. त्यानुसार खासगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या-त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने भाडे आकारणी केल्यास किंवा प्रवास करताना येणाऱ्या अडचणींची तक्रार [email protected] या ई-मेल आयडीवर प्रवाशांनी नोंदवावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : खासगी वाहनांनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे : प्रादेशिक परिवहन अधिकारी appeared first on पुढारी.