नाशिक : खासदार भामरेंकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकौशल्यावर स्तुतिसुमने

पालकमंत्री दादा भुसे www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांचा नुकताच सत्कार सोहळा घेतला. माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा झाला. त्यात डॉ. भामरे यांनी भुसे हे सर्वसामान्यांचे सर्वगुणसंपन्न नेतृत्व असल्याचे वक्तव्य करीत तालुक्याच्या विकासासाठी कार्यकर्त्यांना आम्ही द्वयी बळ देऊ, असे जाहीर केले.

तालुकाध्यक्ष नीलेश कचवे यांच्या अध्यक्षतेखाली सटाणा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत अनैसर्गिक आघाडी केली. परंतु, त्यांच्यात कधीच समन्वय निर्माण होऊ शकला नाही. तेव्हा सेनेच्या 40 आमदारांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडत सत्तांतर घडविले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आले. मंत्रिमंडळात भुसे यांना स्थान मिळून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही लाभले, ही मालेगावच्या द़ृष्टीने आनंदाची बाब असल्याचा यावेळी ऊहापोह झाला. पालकमंत्री भुसे हे सर्वसमावेशक नेतृत्व असून, त्यांचे कायमच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी सलोख्याने संबंध राहिले आहेत. या समन्वयातून मालेगावच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. भामरे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपचे प्रदेश सदस्य लकी गिल, संजय दुसाने, शशी निकम, विनोद वाघ, डॉ. मिलिंद पवार, मुकेश झुनझुनवाला, प्रमोद निकम, संभाजी कापडणीस आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : खासदार भामरेंकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकौशल्यावर स्तुतिसुमने appeared first on पुढारी.