नाशिक : खून करुन फरार झालेला संशयित 9 वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती

अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वडाळ्यातील मेहबूबनगर येथे नऊ वर्षांपूर्वी एकाचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनने नवी मुंबईतील घनसोली येथून मंगळवारी (दि. 2) ताब्यात घेतले. मंगरू ऊर्फ अब्दुल मन्नान चौधरी (मूळ रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. घनसोली, मुंबई) असे या संशयिताचे नाव आहे.

मंगरू याच्यासह अल्लारक्षा मसल्ली शहा (20,रा. उत्तर प्रदेश) व एका विधिसंघर्षित बालकाने अब्दुल सलाम मुस्तफा चौधरी याचा 4 मार्च 2013 रोजी गळा आवळून खून केला होता. तिघेही संशयित अब्दुल चौधरीकडे कामास होते. अब्दुल हा जास्त वेळ काम करवून घेतो व पैसे देत नाही यामुळे तिघेही अब्दुलवर संतप्त होते. त्यातच मंगरू यास विवाहासाठी मुलगी पाहण्यासाठी गावी जायचे होते. मात्र, अब्दुल याने मंगरूला पैसे व सुटी दिली नाही. यामुळे तिघांनी कट रचून अब्दुलचा मफलरने गळा आवळून खून केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून अल्पवयीन संशयितासह अल्लारक्षा शहा यास पकडले होते तर मंगरू फरार झाला होता.

दरम्यान, मंगळवारी (दि. 2) युनिट दोनचे हवालदार चंद्रकांत गवळी यांना मंगरू हा मुंबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती कळाली. त्यानुसार पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त संजय बारकुंड व गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार नंदू नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, गुलाब सोनार, अंमलदार राहुल पालखेडे यांचे पथक मुंबईला गेले. त्यांनी नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घनसोली परिसरातून मंगरू यास पकडले. त्यास इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : खून करुन फरार झालेला संशयित 9 वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती appeared first on पुढारी.