नाशिक : गणेशविसर्जनानिमित्त आज-उद्या वाहतूक मार्गात बदल

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळानंतर दोन वर्षांनी अपूर्व उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. शहरातील मोठ्या सार्वजनिक मित्रमंडळांनी केलेली आरास विसर्जनाच्या पूर्वसंध्येला खुली करण्याची प्रथा आहे. त्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकांना मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस दलाने गुरुवारी (दि. 8) व शुक्रवारी (दि. 9) शहरांतर्गत वाहतुकीचे नियोजन जाहीर केले आहे. काही मार्ग व चौकांत दुचाकीसह सर्वच वाहनांना प्रवेशबंदी केली जाणार आहे. त्यानुसार नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी आवाहन केले आहे.

शहरात यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झाली असून, त्याठिकाणी लक्षवेधी आरासचे नियोजन दिसून येत आहे. गुरुवारी सायंकाळी आरास खुली होईल. तेव्हा सायंकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत दर्शनार्थ भाविकांची गर्दी उसळेल. तर, शुक्रवारी सकाळी 9 पासून रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुकांचा माहौल असेल, तेव्हा या काळात संगमेश्वर लोकमान्य विद्यालय आणि रामसेतू पूल पूर्व व पश्चिम, डॉ. आंबेडकर पूल, सांडवा पूल, शनिमंदिर, पेरी चौक (किदवाई रोड), सरदार चौक, शास्त्री चौक, नेहरू चौक, मामलेदार गल्ली, पाचकंदिल, पोफळे राममंदिर, टिळक चौक, टिळक रोड, शिवशक्ती चौक, जुने मनपा कार्यालय आदी ठिकाणी बॅरिकेड्स लावून सर्वच वाहनांना प्रवेशबंदी असेल. या वेळेत अल्लमा एकबाल पूल, मोतीबाग नाका, बसथांबा, शिवतीर्थ या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

पोलिसांचाही उत्साह
आझादगर पोलिसांनी प्रतिष्ठापना केलेल्या ‘श्रीं’ची पाचव्या दिवशी मंगळवारी विधिवत पूजा करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते आरती होऊन सुशोभित बैलगाडीवरून गणेशमूर्तीची महादेव घाटापर्यंत मिरवणूक निघाली. सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी भगवे फेटे परिधान करून एकच जल्लोष केला.

हेही वाचा:

The post नाशिक : गणेशविसर्जनानिमित्त आज-उद्या वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.