नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे यंत्रणांना निर्देश

ना. डॉ. भारती पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सण-उत्सवांच्या कार्यकाळात कोरोना, चिकूनगुनिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू अशा साथरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत साथरोग नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी यंत्रणांना दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. २९) आरोग्य यंत्रणेसह विविध विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू, स्वाइन फ्लू, कोरोना यासह अन्य साथरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात स्वाइन फ्लूचे १२७ रुग्ण असून, त्यातील चाैघांचा मृत्यू झाला, तर डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १५८ असून, मलेरियाचे ३, चिकूनगुनियाचे १७, तर कोरोनाचे १२६ रुग्ण असल्याची माहिती ना. डाॅ. पवार यांनी दिली. तसेच ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. त्यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागासह जिल्हा आरोग्य विभागाने विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्याचे ना. डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तातडीने परवानगी देण्याच्या सूचना

शहरात ५४७ व ग्रामीण भागात साडेतीन हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तसेच ग्रामीण भागात साडेबारा लाखांच्या आसपास घरगुती गणेश आहेत. गणेश मंडळांना त्रास होऊ नये म्हणून तातडीने विविध परवानग्या देण्यात याव्यात. त्यासाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करावी, आदी सूचना केल्याचे ना. डॉ. पवार यांनी सांगितले.

दुर्घटनेच्या स्थळांवर नजर

विसर्जन मार्गावर, विसर्जन स्थळी तसेच गर्दीच्या ठिकाणी योग्य ते नियोजन करण्यात यावेत. विसर्जनावेळी दुर्दैवी घटना टाळण्यासाठी योग्य ती सतर्कता बाळगताना, यापूर्वी अशा दुर्घटना झालेल्या स्थळांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश ना. डाॅ. भारती पवार यांनी पोलिस व संबंधित यंत्रणांना दिले. देखावे पाहण्यासाठी तसेच मिरवणूक दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे यंत्रणांना निर्देश appeared first on पुढारी.