नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आनंदपर्व; सुट्टीच्या दिवशी साधला खरेदीचा योग

बाजारपेठ नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांनंतर सुरू होणार्‍या गणेशोत्सवापूर्वी आलेल्या रविवार सुट्टीच्या दिवशी नाशिककरांनी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. पूजेचे साहित्य, मखर खरेदीसह सजावटीच्या वस्तू खरेदीमधून मोठी उलाढाल झाल्याने व्यापारीवर्ग सुखावला असून, बाजारात आनंदपर्व सुरू झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

बाजारात गणरायाच्या अत्यंत विलोभनीय अशा मूर्ती उपलब्ध असल्याने स्टॉल्सवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. अनेकांनी मूर्तीची आगाऊ नोंदणी करण्याबरोबरच प्रतिष्ठापनेसाठी लागणार्‍या सजावटीच्या वस्तूंची खरेदी केली. प्लास्टिकबंदी असल्याने कागदी, क्रेपपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानाच्या वेली, विविध लायटिंगची तोरणे उपलब्ध आहेत. लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा विविध रंगीत फुलांच्या तसेच हिरव्या वेलीसारख्या माळा खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. खर्‍याखुर्‍या टपोर्‍या फुलांप्रमाणे कागदी, क्रेपच्या फुलांचे गुच्छ, ताटवे, कमान यांनाही सजावटीसाठी विशेष मागणी आहे. गणेशमूर्तींच्या मागे सोडलेल्या पडद्यावर मोती, कुंदन, काचेच्या माळा, रंगबिरंगी फुलांच्या तसेच लायटिंगची तोरणे सोडण्यात येतात. त्यामुळे मखराची शोभा वाढते. लवंगी, स्ट्रॉबेरी, अ‍ॅपल आदी आकारांतील संगीत विद्युत माळाही बाजारात आल्या आहेत. फिरती छत्री, फिरते चक्र विक्रीसाठी असून, एलईडी व एलपीजीचे रंगीत दिवे, विविध रंगांचे फोकस मखराची अधिक शोभा वाढवत आहेत.

त्याचबरोबर फळविक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. यंदा साहित्याचे दर 30 टक्क्यांनी महागल्याने त्याचा खरेदीवर परिणाम होईल, असे बोलले जात होते. मात्र, नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत खरेदीचा आनंद घेतला. यामुळे बाजारात आनंदपर्व सुरू झाल्याची भावना विक्रेत्यांनी व्यक्त केली.

पूजेच्या साहित्याला मागणी
कापूर, लाल कपडा, धूप, अगरबत्ती, वस्त्र, कुंकू, रांगोळी, तांब्याचे ताट, विडा सुपारी, कापूस, हार, केळीची पाने, नारळ, गुलाल आदी पूजेच्या साहित्याला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षापर्यंत पाच किंवा दहा रुपयाला हे साहित्य मिळत होते. यंदा मात्र प्रत्येक साहित्य 10 रुपये व त्यापेक्षा अधिक दरानेच विकले जात आहे. त्याचबरोबर फळांनादेखील बाजारात मोठी मागणी आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आनंदपर्व; सुट्टीच्या दिवशी साधला खरेदीचा योग appeared first on पुढारी.