नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा जोपासली गेली आहे. यावर्षीपासून ही मिरवणूक मद्यपानमुक्त करू म्हणजे महिलांनादेखील या मिरवणुकीचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी केले.

सिन्नर पोलिस ठाणे व नगर परिषदेच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, नायब तहसीलदार सागर मुंदडा, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी संजय केदार, वावीचे सहायक निरीक्षक सागर कोते, सिन्नरचे सहायक निरीक्षक विजय माळी आदी उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सवाची सुरुवात केली तो हेतू आता साध्य होताना दिसत नाही. गणेश मंडपात जुगार खेळले जाते, महिलांची छेडछाड होते. तरुण दारू पितात. वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे. हे चित्र आता बदलायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करताना कांगणे यांनी कायद्याचे उल्लंघन आणि बीभत्सपणा दिसला तर पोलिस हिसका दाखवतील, असा इशाराही त्यांनी दिला. गणेश विसर्जन मिरवणुका रात्री 12 ला संपवा, गणेशोत्सवाला देखाव्यांच्या माध्यमाने राजकीय रंग देऊ नका, असे आवाहन करताना मंडळांना वीज कनेक्शनसाठी पाच ते सहा हजार रुपये अनामत भरावी लागते. मात्र, वीज वितरणचे उपअभियंता सचिन पवार यांच्याशी चर्चा करून त्या 50 टक्के सवलत देण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक मुटकुळे यांनी सांगितले. राज्यस्तरावरून गणेश मंडळांना तीन बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिली. जिल्ह्यासाठी तीन बक्षीस असतील. सांस्कृतिक कार्यक्रम, परिसर स्वच्छता, गणेशभक्तांना दिल्या जाणार्‍या सुविधा, वाहतुकीचे नियोजन यालाही गुण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळांना विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना उपलब्ध असल्याचे पठारे म्हणाल्या. दरम्यान, तालुक्यात शहर व ग्रामीण भागासाठी तीन-तीन बक्षिसे असावीत, अशी अपेक्षा अतिरिक्त पोलिस अधीक्षक कांगणे यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे, प्रा. आर. के. मुंगसे, डॉ. विष्णू अत्रे, नामदेव कोतवाल, शरद शिंदे, अ‍ॅड. भाग्यश्री ओझा, देशवंडीचे पोलिसपाटील मुकेश कापडी, हरिभाऊ तांबे, मनीष गुजराथी, पिराजी पवार आदींनी मनोगत व्यक्त करताना सूचना मांडल्या. सहायक निरीक्षक सागर कोते यांनी आभार मानले. यावेळी गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलिसपाटील, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

देखाव्यांना पर्यावरणपूरक साहित्य वापरा : केदार
गणेश मंडळांचा मंडप उभारताना 75 टक्के रस्ता मोकळा असावा, सजावटीसाठी प्लास्टिक अथवा थर्माकॉलचे साहित्य वापरू नये, परिसरात निर्माल्य कलश ठेवावा, पूजा साहित्य वगैरे यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, कचरा जास्त साठला असल्यास नगर परिषदेला संपर्क साधून आरोग्य विभागाला उचलून नेण्यास सांगावा, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करावे, अशा सूचना मुख्याधिकारी संजय केदार यांनी केल्या.

मंडळांनी किमान दोन सीसीटीव्ही लावावे : मुटकुळे
गणेशोत्सवानंतर वीज वितरणकडून अनामत रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे नामदेव कोतवाल यांनी सांगितले होते. मुटकुळे यांनी मंडळांनी दहा दिवसांचे वीजबिल भरणा करावा व पावती वीज वितरणला सादर करावी, अकराव्या दिवशी अनामत मिळेल, असा विश्वास दिला. गणेश मूर्तीवर सोने-चांदीचे दागिने असतात, अशा मंडळांना रात्रपाळीत एक पोलिस कर्मचारी दिला जाईल. मंडळाने दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा सूचना कली.

हेही वाचा:

The post नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे appeared first on पुढारी.