नाशिक : गणेशोत्सवामुळे स्मार्ट कंपनी काही कामे ठेवणार बंद

नाशिक रस्ते काम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना तसेच गणेश मंडळांना शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे त्रास सहन करावा लागू नये यासाठी स्मार्ट सिटी कंपनी काही कामे गणेशोत्सव कालावधीत बंद ठेवणार आहे. त्यानुसार मालवीय चौक ते काट्या मारुती चौकापर्यंतचे काम बंद ठेवण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीने केली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गावठाण भागात कामे सुरू आहेत. पावसामुळे कामे धिम्या गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तर काही कामांमुळे रस्तेच बंद असल्याने व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात आता गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने नागरिकांसह गणेश मंडळांची गैरसोय होऊ नये या द़ृष्टीने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी गावठाण भागाचा दौरा करून काही कामे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सुंदरनारायण मंदिर ते पंचवटी कारंजा या ठिकाणी असलेल्या अडचणी सोडवण्याची सूचना केली. मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टॅण्डजवळील सर्व कामे 29 ऑगस्टपूर्वी पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. रामवाडी मुख्य चौफुली (गोदापार्क समोर) रामवाडी पुलाजवळ मुख्य चौफुली येथे काम पूर्ण करून गणेशोत्सव काळात कामामुळे कुठलीही अडचण येणार नाही याबाबत कार्यवाही करण्याची सूचना मोरे यांनी केली आहे.

लक्ष्मीनारायण मंदिर ते सरदार चौक या भागात गणेश मंडळांना मंडप टाकण्यासाठी अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. गोरेराम लेन (कमल साडी ते दशभुजा सिद्धिविनायक मंदिर) रस्ता तात्पुरता रहदारीसाठी खुला करून उपाययोजना केली जाणार असून, गायधनी लेन (रविवार कारंजा ते ओम श्री रेणुका माता प्रसन्न येथपर्यंत) तात्पुरता स्वरूपात रहदारीसाठी खुला करून दिला आहे.

भालेकर मैदानावर सुरक्षारक्षक

भालेकर मैदानावर सुरक्षारक्षक भालेकर मैदानावर स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांचे पाइप ठेवण्यात आले आहे. परंतु, यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने पाइप उचलून घेण्याची मागणी गणेश मंडळांनी केली होती. परंतु, त्यावर उपाय म्हणून स्मार्ट सिटी कंपनी त्याठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करणार असून, अधिकारी क्षेत्रभेटी करणार असल्याचे सुमंत मोरे यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गणेशोत्सवामुळे स्मार्ट कंपनी काही कामे ठेवणार बंद appeared first on पुढारी.