नाशिक : गणेशोत्सवाला ‘स्मार्ट’ कामांचा अडसर; स्मार्ट कंपनी कामांकडे लक्ष देणार का?

Smart nashik www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

शहरात स्मार्ट सिटी कंपनीमार्फत योग्य लक्ष दिले जात नसल्याने तसेच ठेकेदारांनी काम बंद ठेवल्याने स्मार्ट योजनेअंतर्गत सुरू असलेले अनेक रस्ते पावसामुळे उखडले असून, अर्धवट कामे झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच कालिदास कलामंदिरासमोरील स्मार्ट पार्किंगचे चित्र पाहिले तर या वाहनतळाला स्मार्ट कसे म्हणावे, असा प्रश्न पडतो. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी स्मार्ट कंपनीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

येत्या ३१ आॉगस्टपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. लाडक्या गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत होणार असल्याने त्याची जय्यत तयारी गणेशोत्सव मंडळाकडून केली जात आहे. शहरातील रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, अशोकस्तंभ, शालिमार, मेनरोड, जुने नाशिक तसेच बी. डी. भालेकर मैदान याठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यातही भालेकर मैदान म्हणजे नाशिकच्या गणेशोत्सवाची जणू ओळखच बनलेले आहे. याठिकाणी दहा ते बारा गणेश मंडळाच्या माध्यमातून देखावे, आरास साकारल्या जातात. यामुळे आरास साकारण्याकरता हे मैदान पंधरा दिवस आधीच ताब्यात घेणे गरजेचे असते. स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून या मैदानावर स्मार्ट पार्किंग उभारण्यात आली आहे. मात्र कंपनी, मनपा आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे या स्मार्ट पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. कंपनीच्या कामासाठी लागणारे पाईप याठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पावसामुळे मैदानाच्या आजुबाजुला गाजरगवत वाढले आहे. रात्री याठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन अनेक मद्यपी मद्य प्राशन करून त्याठिकाणी कचरा आणि काचेच्या बाटल्या टाकून पसार होत असतात. यामुळे स्मार्ट कंपनीने या प्रकाराची दखल घेऊन मैदानाची स्वच्छता करण्याबरोबरच त्याठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची मागणी गणेश मंडळांकडून केली जात आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी नाशिक शहरातून भव्य दिव्य अशी सार्वजनिक मिरवणूक काढली जाते. वाकडी बारव ते रामकुंड असा मिरवणुकीचा मार्ग असतो. या मार्गात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीकडून रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच मुख्य मिरवणूक मार्गाला येऊन मिळणाऱ्या अनेक मार्गांवरही स्मार्ट सिटीची अर्थवट कामे सुरू असून, पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची डागडूजी करून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

कालिदासमोरील वाहनतळावर गाजरगवत उगवले आहे. इतरही प्रकारचा कचरा झाल्याने मैदानाची स्वच्छता होण्याची गरज आहे. कारण याठिकाणी गणेशोत्सवात अनेक मोठ मोठ्या संस्था आणि कंपन्यांचे गणेश मंडळे आरास साकारत असतात. त्यापार्श्वभूमीवर तयारी करण्याकरता मैदान आधीच ताब्यात घ्यावे लागते. – गणेश बर्वे, गणेश मंडळ.

हेही वाचा:

The post नाशिक : गणेशोत्सवाला ‘स्मार्ट’ कामांचा अडसर; स्मार्ट कंपनी कामांकडे लक्ष देणार का? appeared first on पुढारी.