नाशिक : गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची पोलिस आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार असून, या पार्श्वभूमीवर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. पोलिसांनीही नियोजनाला सुरुवात केली असून, शनिवारी (दि.१३) सायंकाळी पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. सलग सुट्यांमुळे बाजारपेठेत झालेल्या गर्दीत पोलिस अधिकाऱ्यांना पाहणी करताना काहीसा अडसर आला.

यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून, कोरोनाचे सावट कमी झाल्याने यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात होणार आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक मंडळांसह पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार, साजन सोनवणे, कुमार चौधरी यांसह इतर अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. भद्रकाली परिसरातील वाकडी बारव, फुले मंडई, बादशाही कॉर्नरमार्गे मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, मेहेरमार्गे अशोकस्तंभ या मार्गावरून पथकाने पाहणी केली. यावेळी मिरवणूक मार्गातील अडथळे व अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या अडचणी आयुक्तांच्या नजरेस पडल्या. त्यातच यंदा गणेशमूर्तींच्या उंचीची अट शिथिल आहे. यामुळे वायरींचाही प्रश्न निकाली काढावा लागणार आहे.

गुरुवारी होणार बैठक : नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने यंदा डीजेसहित रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी मागितली आहे. अद्याप पोलिस यंत्रणेने परवानगी प्रक्रिया सुरू केलेली नाही. गणेशोत्सवासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.१८) आयुक्तालयात बैठक होण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत शासकीय सुट्या असल्याने गुरुवारी बैठक होईल. या बैठकीत गणेशोत्साबाबत निर्णय व नियमावली स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

गर्दीत “वर्दी’ : पाहणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा ताफा भद्रकालीतून मेनरोडला आल्यावर नाशिककरांच्या गर्दीत अडकला. सलग सुट्यांमुळे नाशिककरांनी बाजारपेठेत खरेदीला गर्दी केली आहे. त्याचवेळी पोलिसांचे पायी पथक तेथे आले व त्यांच्या मागे सर्व पोलिस वाहनांच्या रांगा होत्या. यामुळे दुचाकी व इतर वाहनांच्या कोंडीत भर पडली. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी गर्दीत अडकल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाल्याचे दिसत होते.

हेही वाचा:

The post नाशिक : गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची पोलिस आयुक्तांकडून पाहणी appeared first on पुढारी.