नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना

वाहतुक स्वयंसेवक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाजवळ वाहतूक नियमनाची कार्यवाही करावी. त्यासाठी स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना पेालिसांनी केल्या आहेत. मंडळांना परवानगी देताना पदाधिकार्‍यांकडून हमीपत्र लिहून घेतले जात आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त गणेशोत्सव असला, तरी नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्याचा संदेश यंत्रणेने दिला आहे.

यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याने अनेक मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना आकर्षक देखावे बघण्यास मिळणार आहे. त्यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन सुरू केले आहे. दुसरीकडे पोलिस व महापालिकेने एक खिडकी योजनेतून मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या परवानगी प्रक्रियेत मंडळांकडून हमीपत्र घेण्यात येत आहे. त्यामध्ये ‘मंडपामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन मंडपात चेंगराचेंगरी होणार नाही. मंडपाच्या दोन्ही बाजूने सुरक्षेसाठी दोरखंड किंवा सुरक्षाव्यवस्था उभारण्यात येईल. जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही. तसेच भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र जागेचे नियोजन केले जाईल. कोणत्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. याची दक्षता मंडळ घेईल’, असे लिहून घेण्यात येत आहे. या हमीपत्रावर मंडळाच्या अध्यक्षांची स्वाक्षरी झाल्यानंतर परवानगी दिली जात आहे. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होणार असला, तरी नियमांचे पालन करण्याचे बंधन मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर आहे. गणेशोत्सवात गर्दीच्या ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्याचे निर्णय होणार आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेतर्फे आदेश काढले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना appeared first on पुढारी.