नाशिक : गणेश मंडळांना मंडप, स्टेज, स्वागत कमानींचे परवाना शुल्क माफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणारे मंडप, स्टेज, स्वागत कमानी यासाठी परवाना शुल्क माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी तशा स्वरूपाचे आदेश जारी केले असून, त्यामुळे शहरातील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, मंडळांच्या जाहिरातींवर मात्र जाहिरात शुल्क कायम राहणार आहे.

महापालिका गणेश मंडळांकडून मंडप परवानगीसाठी ७५० रुपये भाडे आकारले जाते. स्वागत कमानीसाठीही ७५० रुपयांचे शुल्क आकारले जाते. मंडळांनी देखाव्यांच्या ठिकाणी उभारलेल्या जाहिरात फलकांवरही कर आकारणी केली जाते. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे महापालिकेने हे शुल्क माफ केले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत मंडळांनी मनपा जागेवर उभारणी केलेले मंडप, स्टेज, स्वागत कमानींसाठी परवाना शुल्क माफ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंंत्र्यांनी मंडप, स्टेज, कमानींना परवाना शुल्क माफ करण्याबाबत सर्व महापालिकांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गणेश मंडळांना मंडप, स्टेज, स्वागत कमानींचे परवाना शुल्क माफ appeared first on पुढारी.