नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एम. फॉरेक्स आणि कॉर्बेट क्रिप्टो कॉइन या अ‍ॅप व संकेतस्थळाच्या माध्यमातून दोघांनी शहरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवराज रुस्तम गायकवाड – पाटील (40, रा. पवननगर, सिडको) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

युवराज यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मोहमंद हबीब मोहमंद हनीफ (रा. गुलबर्गा, राज्य कर्नाटक), मोहमंद अब्बास मोहमंद युसूफ या दोघा संशयितांनी 2021 मध्ये त्यांच्यासह इतर गुतंवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. पोलिसांकडे दाखल गुन्ह्यानुसार आतापर्यंत 15 गुंतवणूकदारांची 4 कोटी 18 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. संशयितांनी संगनमत करून युवराज यांच्यासह त्यांचे मित्र व इतरांना बक्षिसे, लक्झरी कार, विदेश यात्रा व सहा महिन्यांत गुंतवणुकीच्या दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी सुरुवातीस संशयितांनी एम. फॉरेक्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर सहा महिन्यांनी संशयितांनी कॉर्बेट क्रिप्टो करन्सी नावाचे संकेतस्थळ व अ‍ॅप तयार करून त्यात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपये गुंतवले. मात्र, त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही किंवा गुंतवलेली रक्कमही परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुमारे 15 गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असेल त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस. एम. पिसे यांनी केले आहे.

अ‍ॅपवरून आर्थिक व्यवहार
संशयितांनी गुंतवणूकदारांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी कॉर्बेट क्रिप्टो कॉइन अ‍ॅप सुरू केले होते. या अ‍ॅपवरून गुंतवणूकदारांना यूपीआयसारखे आर्थिक व्यवहार करता येत होते. मात्र, हे अ‍ॅपदेखील सहा महिन्यांत बंद करून संशयित पसार झाले. अवघ्या वर्षभरात या संशयितांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक appeared first on पुढारी.