नाशिक : गुगुळवाडकरांचा पाण्यासाठी टाहो; ‘मजिप्रा’च्या कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
ऐन पावसाळ्यात माळमाथ्यावरील गुगुळवाड गावाला पंधरवड्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. दहिवाळसह 26 गाव पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी आणि अन्य समस्यांच्या मालिकेमुळे गावकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी येथील ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’च्या उपविभागीय कार्यालयात मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन केले. सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन हे सायंकाळी चार वाजता सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले.

गुगुळवाडला गिरणा धरणावरील दहिवाळसह 26 गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. गुगुळवाड व पळासदरे येथे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी झोडगेकडून जलवाहिनी टाकण्याचे नियोजन झाले. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री दादा भुसे यांनी तीन लाख रुपये आणि गुगुळवाड व पळासदरे ग्रामपंचायतीने प्रत्येकी दोन लाख रुपये असा सात लाखांचा निधी उभा केला. परंतु, हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. गुगुळवाड हे योजनेच्या सर्वात शेवटच्या टोकाला असलेले गाव आहे. त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी नियमित व पुरेशा दाबाने मिळत नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही सुधारणा झालेली नाही.  सद्यस्थितीत गेल्या 15 दिवसांपासून गावात पिण्याचे पाणी आलेले नाही, म्हणून ग्रामस्थांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामपंचायतीकडे तक्रारी दाखल होत असल्या, तरी त्यावर ‘जीवन प्राधिकरण’चे अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात सकाळी धडक दिली. मुख्य अभियंता अनिल पगार हे कार्यालयीन कामानिमित्त नाशिक येथे गेलेले होते. त्यामुळे शाखा अभियंता किरण दाभाडे यांच्या कार्यालयातच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला.

पुरेशा दाबाने नियमित पाणी मिळावे. गावात वाढलेल्या नवीन वाड्या- वस्त्यांवर नवीन जलवाहिनी टाकावी, ठिकठिकाणी वॉल बसविण्यात यावेत, जलकुंभाचे काम त्वरित सुरु करावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. मुख्य अभियंता पगार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून दाभाडे व निकम यांनी चर्चा केली. सर्वच मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. बुधवारी (दि.3) गुगुळवाड येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर सर्व कामे मार्गी लावण्याचे लेखी मिळाल्याने आंदोलन मागे घेर्‍यात आले. याप्रसंगी उपसरपंच सुनील निकम, एस. पी. खैरनार, किशोर खैरनार, विजय निकम, ज्ञानेश्वर निकम आदी उपस्थित होते.

कार्यालयाचे स्पष्टीकरण
दहिवाळसह 25 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 22 गावांना आवर्तन पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. सध्या या योजनेतील एमएस गुरुत्ववाहिनी व एसी लीडिंगमेन फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. दरम्यान, गुगुळवाडला सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी गावांत 2500 मीटर वाढीव वितरण व्यवस्था टाकण्यात येत आहे. गावात एक लाख 35 हजार लिटर क्षमतेचा जलकुंभही उभारण्यासाठी ठेकेदाराला कार्यादेशही दिला आहे. सध्या योजनेतील 180 अश्वशक्तीचा एक विद्युत पंप जळाल्याने दुसर्‍या विद्युतपंपाद्वारे पाणीपुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. जळालेला पंप बुधवारी (दि.3) दुरुस्त केला जाईल. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळित होईल, शिवाय इतर कामे महिन्याभरात सुरू करण्यात येईल, असे स्पष्टीकरण मजिप्रा जलव्यवस्थापन उपविभागाचे प्रभारी अधिकारी यांनी दिले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गुगुळवाडकरांचा पाण्यासाठी टाहो; ‘मजिप्रा’च्या कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन appeared first on पुढारी.