नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात मातेसह तीन मुले गंभीर जखमी

nashiikroad www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मातेसह तीन बालके भाजल्याने गंभीर जखमी झाली. सोमवारी (दि. ९) सकाळी पावणेसातच्या दरम्यान जेलरोड परिसरातील लोखंडे मळा परिसरातील नारायणबापू नगरात ही घटना घडली. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

नारायण बापूनगर येथे लोखंडे मंगल कार्यालयासमोर पुंजाजी लोखंडे यांच्या मालकीची पत्र्याची चाळ आहे. या चाळीतील खोल्यांमध्ये अनेक भाडेकरी राहतात. त्यामध्ये मोलमजुरी करणार्‍या भाडेकरूंचा समावेश आहे. आज सकाळी सुगंधा सोनवणे (वय २४) ही महिला मुलांना शाळेत जायचे असल्याने त्यांना चहापाणी व जेवणाचा डबा तयार करून देण्याच्या कामात असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घरावरील पत्रे उडाले, तसेच स्फोटामुळे लागलेल्या आगीत सुगंधा सोनवणे या 50 टक्के भाजल्या असून, त्यांची मुले रुद्र (वय 5) हा 15 टक्के भाजला आहे, तर आर्यन व सूर्या ही दोन मुले पाच टक्के भाजली आहेत. लोखंडे चाळीत स्फोट झाल्याची माहिती कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या महिलेसह तिच्या मुलांना प्रथम बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला मुलांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे कर्मचारी सुभाष निकम, शांताराम गायकवाड, रामदास काळे, मनोज साळवे, श्रीकांत नागपुरे व अशोक मोदी यांनी यांच्या पथकाने मदतकार्य करून आग आटोक्यात आली.

हेही वाचा:

The post नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात मातेसह तीन मुले गंभीर जखमी appeared first on पुढारी.