नाशिक : गोंदे -पिंपरी सदो महामार्गाच्या सहा पदरीकरणासाठी सातशे कोटींचा निधी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : गोंदे ते पिंपरी सदो यादरम्यान सहापदरी महामार्ग व्हावा यासाठी मागणी होत होती. खा.हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना आता मोठे यश आले आहे.

गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या महामार्गाच्या सहा पदरीकरणासाठी सुमारे सातशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी या निधीला मंजुरी दिली. यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या वाहतुक कोंडीची समस्या टळणार आहे. तसेच धुळे, नंदुरबार आणि जळगाव या खान्देशातील प्रवाशांना देखील समृद्धी महामार्गाला सहजपणे जुडणे शक्य आहे. त्याचबरोबर मुंबईला देखील कमीत कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. या सहापदरी महामार्गाचा येत्या 18 डिसेंबर रोजी भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

गोंदे फाटा ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. पिंपरी सदो पासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार हेमंत गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते.

खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने सोमवारी (दि. २८) ना.गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे.येथे अठरा डिसेंबर रोजी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या वीस किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा

The post नाशिक : गोंदे -पिंपरी सदो महामार्गाच्या सहा पदरीकरणासाठी सातशे कोटींचा निधी appeared first on पुढारी.