नाशिक : गोदाघाटावर उत्तर भारतीयांची उसळली गर्दी

नाशिक : गोदाघाट,www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
रामकुंडासह गोदाघाट परिसरात आलेल्या भाविकांकडून मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले. कार्तिक शुद्ध चतुर्थीपासून सुरू झालेल्या छठ पर्वाच्या उपासनेतील षष्ठीचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. सध्या नाशिकमध्ये राहात असलेले मूळचे बिहार व झारखंड येथील नागरिकांकडून ही उपासना करण्यात आली. त्यांनी सायंकाळी गोदापात्रात उभे राहून सूर्याला अर्घ्य दिले. त्यानंतर काही भाविक रात्रभर थांबून होते, तर काही पूजेनंतर घरी परतले.

रामकुंड परिसरात ही उपासना करणार्‍यांची गर्दी दुपारपासूनच झाली होती. होळकर पुलापासून थेट गौरी पटांगणापर्यंत दोन्ही काठांवर भाविकांनी पूजा मांडली होती. उसाचे तोरण उभारून त्याच्या खाली सूप व बांबूच्या टोपल्यांमध्ये विविध प्रकारची फळे ठेवण्यात आली होती. दिवे पेटवून व उदबत्ती लावून सहकुटुंब पूजा करण्यात येत होती. दूध, तांदूळ, नारळ, सिंदूर, हळद, ऊस, अननस, सुथनी, भाजी आणि शकरकंदी, नाशपती, मोठे लिंबू, मध, पान, साबूत सुपारी, कैराव, कापूर, चंदन, मिठाई, प्रसादाच्या रूपात ठेकुआ, पालपुआ, खीर-पुरी, रव्याचा शिरा किंवा तांदळाचे लाडू आदी साहित्य बांबूंच्या टोपलीत ठेवण्यात आले होते. सूर्यास अर्घ्य देताना सुपामध्ये प्रसाद ठेवून दिवा लावण्यात येत होता. नदीच्या पाण्यात उतरून सूर्यास अर्घ्य दिले जात होते.

भाऊबिजेपासून तिसर्‍या दिवशी छठ व—ताचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सेंधा मीठ, तुपात तयार केलेले अरवा तांदूळ आणि कद्दूची भाजी प्रसाद रूपात अर्पण करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशीचा उपवास सुरू झाला. त्या दिवशी रात्री खिरीचा प्रसाद व—त केलेल्यांनी ग्रहण केला. तिसर्‍या दिवशी मावळत्या सूर्यास अर्घ्य म्हणजे दूध अर्पण करण्यात आले. अंतिम दिवशी उगवत्या सूर्यास जलरूपी अर्घ्य देण्यात आले.

गत दोन वर्षे कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे नदीपात्रात येऊन सूर्यास अर्घ्य देणे शक्य झाले नसल्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी दुपारपासूनच रामकुंड व गंगाघाट परिसराकडे येणारे रस्ते बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद केले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदाघाटावर उत्तर भारतीयांची उसळली गर्दी appeared first on पुढारी.