नाशिक : गोदाघाटावर होणार आज रावणदहन

रावण दहन नाशिक गोदाघाट,www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
विजयादशमीनिमित्त अर्थात, दसर्‍याच्या दिवशी बुधवारी (दि. 5) सायंकाळी गोदाघाटावरील रामकुंड येथे चतुःसंप्रदाय आखाड्याच्या वतीने रावणदहन होणार आहे. यंदा 60 फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात आला आहे.

आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधुदास महाराज यांनी 1967 ला रामकुंड परिसरात प्रथम रावणदहन सुरू केले. त्यानंतर ही परंपरा महंत कृष्णचरणदास महाराज यांनी पुढे सुरू ठेवली आहे. मूर्तिकार सुनील मोदवाणी हे रावणाचा दहातोंडाचा व 60 फुटी उंचीचा प्रतीकात्मक पुतळा तयार करीत आहेत. रावणदहनाआधी मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे महंत कृष्णचरणदास महाराज व बालाजी भक्त मंडळाने कळविले आहे. दरम्यान चौंडेश्वरी देवी सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळाच्या वतीनेही रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शंकर वाडेकर यांनी दिली.

एकलव्य संघटनेचा विरोध ः एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा दीपाली बांडे यांनी नाशिक जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्त यांना निवेदन देत रावणदहनाला विरोध दर्शविला आहे. जे कोणी विजयादशमीच्या दिवशी राजा महात्मा रावण यांच्या पुतळ्याचे दहन करेल त्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गांधीनगर येथेही रावणदहन
नाशिकरोड : गांधीनगरच्या ऐतिहासिक रामलीलेचा समारोप बुधवारी दसर्‍याला रावणदहनाने होणार आहे. रावणदहन कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कारविजेते ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक शाहील हाडा, कपिल शर्मा, दसरा समिती अध्यक्ष पप्पू कोहली, दिग्दर्शक हरीश परदेशी, संजय लोळगे, प्रदीप भुजबळ, मनोहर बोराडे, सुनील मोदियानी, भरत राव, सागर पुरी, साहिल शर्मा, तस्लीम पठाण आदींची प्रमुख उपस्थिती राहील. 1954 पासून ही परंपरा आजपर्यंत टिकून आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदाघाटावर होणार आज रावणदहन appeared first on पुढारी.