नाशिक : गोदाघाट परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम

गोदाघाट अतिक्रमण निर्मूलन,www.pudhari.news

 नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

गोदाघाटासह रामकुंड परिसरात मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांनी शुक्रवारी (दि. २५) अचानक भेट देत पाहणी केली. यानंतर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्यास सुरुवात केल्याने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

चतुःसंप्रदाय आखाड्याजवळील वाहन पार्किंग परिसरात तसेच रामकुंड, अहिल्याराम पटांगण, जुना भाजीबाजार पटांगण, गांधी तलाव, देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण आदी भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर छोटे मोठे व्यावसायिक अनधिकृतपणे व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले होते. यातच मनपा आयुक्तांनी शुक्रवारी अचानकपणे पाहणी दौरा केला. यावेळी परिसरात अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी अनधिकृतपणे हातगाड्या, टपऱ्या व दुकाने थाटल्याचे आढळले. आयुक्तांनी मनपा अधिकाऱ्यांना या विषयावर धारेवर धरत पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांना तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. यानंतर लागलीच पंचवटी विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने चतुःसंप्रदाय आखाडा वाहन पार्किंग परिसरात जोरदार मोहीम राबवली. यावेळी कर्मचाऱ्यांनी अनेक व्यावसायिकांचे साहित्य जप्त केले. तर टपरीधारकांना टपऱ्या हटविण्यासाठी अवधी दिला. यामुळे येथील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. या मोहिमेला व्यावसायिकांनी विरोध केला नसला तरी ही मोहीम यापुढेही रामकुंडासह गोदाघाट परिसरात सुरू राहणार असल्याचे राभडिया यांनी सांगितले. मोहीम सुरू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पंचवटी पोलिस तैनात करण्यात आले होते.

ठेकेदाराला त्रास झाल्यानंतर कारवाई ?

गोदाघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. चतुःसंप्रदाय आखाड्याजवळील वाहन पार्किंग येथे दगडी फरशा, दीपमाळ व लक्ष्मण कुंडावर नव्याने पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. याचा त्रास अनेकदा येथील व्यावसायिकांना होत असल्याने, काही दिवसांपूर्वी येथील व्यावसायिकांनी बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे बोलले जात आहे. यामुळेच शुक्रवारी मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ यांनी पाहणी करून येथील टपऱ्या हटविण्याचे आदेश दिले व अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्याची चर्चा रामकुंड परिसरात दिवसभर सुरू होती.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदाघाट परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम appeared first on पुढारी.