नाशिक : गोदावरीतील मृत मासे प्रकरणाची गंभीर दखल

गोदावरीत मृत मासे

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

जलप्रदूषणामुळे गोदापात्रात आढळलेल्या मृत मासे प्रकरणी महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली असून, शुक्रवारी (दि.२१) सकाळी गोदाघाटावरील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी गोदावरीतील पाण्याचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

चार ते पाच दिवसांपूर्वी गोदापात्रामध्ये शेकडो मासे मृत झाल्याची बाब गोदामाई फाउंडेशनने उघडकीस आणली. या संदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये शुक्रवारी ‘गोदावरीत शेकडो माशांचा तडफडून मृत्यू’ या मथळ्याखाली छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदाघाटावर संयुक्त पाहणी दौरा केला. महापालिकेचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांच्या सूचनेनुसार मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग, भुयारी गटार योजना विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून कर्मचाऱ्यांना गोदापात्राची साफसफाई करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी तातडीने कर्मचाऱ्यांमार्फत नदीपात्रातील पाणवेली व कचरा काढण्यात आला.

यावेळी मनपाचे पंचवटी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उदय वसावे, दीपक चव्हाण, भुयारी गटार योजना विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता गणेश मैड, उपअभियंता अशोक गाजूल, अजय खोजे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

आठवडाभरानंतर मिळणार अहवाल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने गोदावरी नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात पाण्याचा अहवाल प्राप्त होताच नदीच्या पाण्याच्या स्वच्छता व शुद्धतेबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदावरीतील मृत मासे प्रकरणाची गंभीर दखल appeared first on पुढारी.