नाशिक : गोदावरीसह चार उपनद्यांचे होणार जीआयएस मॅपिंग

गोदावरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नमामि गंगा या प्रकल्पाच्या धर्तीवर गोदावरी नदी आणि तिच्या चार उपनद्यांचे प्रदूषण कमी करणे आणि सौंदर्यीकरणाकरता मनपाच्या माध्यमातून नमामि गोदा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांकरता गोदावरीसह उपनद्यांचे जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे. नमामि गोदा आणि प्रोजेक्ट गोदा ही दोन्ही कामे करताना ते दुबार होऊ नये याकरता जीआयएस मॅपिंग ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नमामि गोदा प्रकल्पाचा बेस मॅप तयार करण्यात येणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या माध्यमातूनदेखील गोदावरी व परिसरातील कामे केली जाणार आहेत. ही सर्व कामे दुबार होऊ नये याकरता जीआयएस मॅपिंग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाशिक महापालिकेच्या नगर रचना विभागामार्फत शहरातील मालमत्ता, सार्वजनिक रस्ते, मिळकती, नैसर्गिक नाले यांचे ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टिम (जीआयएस) मॅपिंग करण्यात येत आहे. नमामि गोदा प्रकल्पासाठीदेखील बेस मॅप तयार करणे आवश्यक असल्याने त्याकरतादेखील जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार मिळकत विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. सिंहस्थानिमित्त मनपाच्या माध्यमातून गोदावरी सुशोभीकरणाकरता मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जाणार आहे. तसेच स्मार्ट सिटी कंपनीने प्रोजेक्ट गोदा हाती घेतला असून, त्याव्दारे देखील गोदावरीच्या सुशोभीकरणाची कामे होणार आहेत. नमामि गोदा प्रकल्पातदेखील गोदावरी सौंदर्यीकरण व प्रदूषणमुक्तीबाबतच्या उपाययोजना केल्या जाणार असल्याने या कामांचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने जीआयएस मॅपिंग महत्त्वाची भूमिका ठरू शकते. सध्या जीआयएस मॅपिंगचे काम अक्षय इंजिनियर या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे.

महापालिकेच्या माध्यमातून गोदावरी नदी व चार उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील २० वर्षांचा विचार करून मलनिस्सारण योजनेचा अभ्यास करण्यात येणार असून, त्यादृष्टीने विविध उपाययोजना सुचविणे, जुन्या मलवाहिकांच्या जागी नव्या वाहिका टाकणे, पंपिंग स्टेशन व मलजलशुध्दीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे तसेच नवीन केंद्रांची उभारणी करणे, नदीकिनारी घाट बांधणे अशी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदावरीसह चार उपनद्यांचे होणार जीआयएस मॅपिंग appeared first on पुढारी.