नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार

गोदावरी नदी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचा शिक्षण विभाग पुढे सरसावला आहे. त्या अनुषंगाने शाळेत प्रार्थनेच्या वेळी गोदावरी नदी स्वच्छतेबाबत विद्यार्थी आणि शिक्षक शपथ घेणार असून, गोदासंवर्धनासाठी प्रार्थना म्हटली जाणार आहे. त्याशिवाय 25 मे 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

मनपा शिक्षण विभागामार्फत जुलै महिन्यात रांगोळी स्पर्धा, ऑगस्टमध्ये ‘निर्माल्य आणि इतर कचरा नदीत टाकू नये’ याबाबत जनजागृती तसेच सप्टेंबरमध्ये निर्माल्यापासून खतनिर्मिती, ऑक्टोबरमध्ये प्लास्टिक कचरा रस्त्यावर किंवा नदीत टाकू नये, अशा मुद्दाने जनजागृती केली जाणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात ‘नदीच्या स्वच्छतेबाबत उपक्रम सुचवा’ स्पर्धा घेतली जाणार आहे. डिसेंबरमध्ये ‘मी गोदावरी नदी बोलते’ या विषयावर एकपात्री नाट्य स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तसेच जानेवारी 2023 मध्ये ‘गोदावरी स्वच्छता’ यावर गीतरचना स्पर्धा, फेब—ुवारी 2023 मध्ये नदीच्या स्वच्छतेबाबत ‘मी नाशिक’ या नात्याने या विषयावर वक्तृत्व स्पर्धा तर मार्च 2023 मध्ये ‘गोदावरी नदी वाचवा’ यावर शासकीय कर्मचार्‍यांना जनजागृतीपर शपथ दिली जाणार आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत करण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी मनपा शिक्षण विभागामार्फत केली जात आहे. स्वच्छतेबाबत सर्व केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना कळविण्यात आले असून, या उपक्रमांमुळे गोदावरी नदी स्वच्छतेसाठी हातभार लागणार असल्याचे मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार appeared first on पुढारी.