नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार

सांडपाणी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील त्र्यंबक, नाशिक आणि निफाड तालुक्यात गोदावरी नदीमध्ये जाणारे सांडपाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता गोदेकाठी शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.

गोदेकाठी त्र्यंबक तालुका आणि नाशिक शहर या ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी नाशिककरांची आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने हे पाऊल उचलले आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि निफाड या तीन तालुक्यांत गोदावरी नदीकाठी येणारी गावे कोणती आणि किती, त्या गावांमधून जाणारे सांडपाणी थेट नदीत मिसळते का ? याबाबत उपाययोजना काय होऊ शकते ? शोषखड्ड्यांबाबत मनरेगामधून कामे होऊ शकतील. आदी विषयांवर तिन्ही तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात चर्चा झाली. याबाबत होणाऱ्या पुढच्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना सीईओंनी दिली आहे.

गोदावरी नदीमध्ये ग्रामीण भागात सांडपाणी मिसळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता त्र्यंबक, नाशिक आणि निफाड या तालुक्यांमध्ये शोषखड्ड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. तिन्ही गटविकास अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत.

– आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार appeared first on पुढारी.