नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे

राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी संबंधित सर्व अधिकार्‍यांनी नियोजन करावे. तसेच पीओपी गणेशमूर्तीऐवजी पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्तीची स्थापन करावी, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मुख्य अभियंता निर्मिती औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे सुनील पाटील, उपआयुक्त (करमणूक शुल्क) कुंदनकुमार सोनवणे, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, सहायक पोलिस निरीक्षक जी. आर. परचुरे, प्रा. डॉ. प्राजक्ता बस्ते, निशिकांत पगारे, राजेश पंडित आदी उपस्थित होते.

गोदावरी संवर्धनाबाबत तयार करण्यात आलेले संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्यात यावे. संकेतस्थळावर नोंदविल्या जाणार्‍या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी चार पोलिस उपनिरीक्षक आणि 30 कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही पोलिस आयुक्तालयामार्फत करण्यात येत आहे. संबंधित कर्मचार्‍यांच्या यादीसोबत नियुक्त कर्मचार्‍याचे संपर्क क्रमांकही नमूद करण्यात यावे, असेही गमे यांनी बैठकीत सांगितले.

पाणवेलींच्या पुनर्वापरासाठी सल्ला
महापालिकेने गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित केलेला आहे. कक्षामार्फत गोदावरी संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच गोदावरी नदीपात्रालगत तसेच पुलांवर पूजेच्या वस्तू, पूजेचे साहित्य व निर्माल्य टाकण्याकरिता बसविण्यात आलेेले निर्माल्य कलश वेळच्या वेळी रिकामे करण्यात यावे. केरळच्या धर्तीवर या पाणवेलींचा पुनर्वापर करण्याबाबतही केरळच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात यावा आदी सूचना गमे यांनी दिल्या.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.