Site icon

नाशिक : गोळीबाराने सिडको हादरले; एक आरोपी ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील गोळीबाराची चर्चा सुरु असताना सिडकोतील बाजीप्रभू चौकात राकेश कोष्टीवर अंतर्गत वादातून एका टोळीने दुचाकीवर येत गोळीबार केला. या घटनेत राकेश कोष्टी जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिडकोतील साईबाबानगर येथे राकेश कोष्टी राहतो. कोष्टी नेहमी प्रमाणे देवळात दर्शनासाठी मित्राला घेऊन दुचाकीवर दत्तचौक मटन मार्केट कडून बाजीप्रभु चौकातून जात असताना पाठीमागून दुचाकीवर तीन जण आले. त्यातील एकाने कोष्टीच्या पाठीवर दोन गोळीबाराच्या फैरी झाडल्या यात कोष्टी जखमा झाला. कोष्टीच्या समवेत असलेल्या मित्राने त्याला त्वरीत उत्तमनगर येथील कल्पतरु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाले आहे.  यामध्ये राकेश कोष्टीचे जया दिवे, किरण शेळके, ठाकूर यांच्याशी जुने वाद होते. या वादातून त्याच्यावर सिडकोतील बाजीप्रभु चौकात गोळीबार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समजते. पोलिसांनी जया दिवेला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. अंबड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  राकेश कोष्टी भाजपा माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष आहे व त्याच्यावर पोलिस ठाणे येथे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गोळीबाराने सिडको हादरले; एक आरोपी ताब्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version