नाशिक : गोहत्या थांबवा, जिओ और जिने दो ; भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा

महावीर जयंती,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भगवान महावीर यांनी जगाला अहिंसेची शिकवण दिली आहे. ‘अहिंसा परमो धर्म’ असे म्हणत शहरात सकल जैन समाजाकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘गोहत्या थांबवा, जिओ और जिने दो’ असा संदेश देण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने जैन बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते. शौभायात्रेदरम्यान विविध संघटनांकडून उपक्रम राबविण्यात आले.

‘महावीर भगवान की जय’ असा जयघोष करीत पांढऱ्या वेशभुषेत जैन बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते. रविवार कारंजा येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. मालेगाव स्टॅण्ड, मखमलाबाद नाका, भाव बंधन कार्यालय असा शोभायात्रेचा मार्ग होता. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी शोभायात्रेत हजेरी लावत जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जैन सोशल ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भारतीय जैन संघटनेतर्फे कर्करोग निदान व हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. अरहंता क्लबतर्फे पाणी वाटप केले. तर अनुमोदना ग्रुपने गोहत्या प्रबोधन नाटक सादर केले. शोभायात्रेत आदिवासी पथक, ढोल पथक, लेझीम पथकाने सहभाग नोंदविला होता. बेल्सिंग पाठशाळेच्या विद्यार्थी विविध वेशभूषा साकारून शोभायात्रेत सहभागी झाले होते.

अशोक पाटणी परिवाराला भगवंतांचा रथ आणण्याचा मान मिळाला. यावेळी पाच हजारांपेक्षा अधिक समाजबांधव शोभा यात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान प. पु. दुर्लभ सागरजी व प. पु. संधान सागरजी, प. पु. साध्वी नंदिनीजी, प. पु. साध्वी उपमाजी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महेश शाह, सचिन गांग, पवन पाटणी, जयेश शाह, सुबोध शाह, प्रवीण संचेती, जे. सी. भंडारी आदींनी विशेष प्रयत्न केले.

गजपंथ येथे ध्वजारोहण

गजपंथ येथे सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. राहुल कासलीवाल परिवार यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला. त्यानंतर शोभायात्रा जैन मंदिर म्हसरुळ येथुन निघून गजपंथ सोसायटीमार्गे आकाश पेट्रोल पंपामागील जैनस्थानक येथून परत गजपंथ जैन मंदिर येथे समापन झाले. रथावर भगवंतांना विराजमान करण्याचा मान जबलपूर येथील मुकेश जैन परिवाराला मिळाला. त्यानंतर तेथे भगवंताचा अभिषेक झाला. युवतींनी मंदिरात रांगोळी काढून सजावट केली होती. सोहम पाठशालेच्या मुलांनी शोभायात्रेमध्ये सहभाह घेवुन नुृत्य सादर केले. सकल जैन समाज मेरी म्हसरुळतर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : गोहत्या थांबवा, जिओ और जिने दो ; भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा appeared first on पुढारी.