नाशिक : ग्रामपंचायतींची रणधुमाळी; 25 एप्रिलपासून अर्ज दाखल प्रक्रिया

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सहा गावांमधील थेट सरपंचपदासाठी तसेच 242 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांकरिता निवडणूक होणार आहे. तहसीलदार मंगळवारी (दि. 18) निवडणुकीची अधिसूचना निघणार असून इच्छुकांना 25 एप्रिलपासून अर्ज दाखल करता येतील.

राज्य निवडणूक आयोगाने 34 जिल्ह्यांमधील 2 हजार 620 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 666 रिक्त पदे तसेच 126 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 350 रिक्त व 6 थेट सरपंचांच्या जागांचा समावेश आहे. येत्या मंगळवारी तालुक्याच्या ठिकाणी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत शासकीय सुटी वगळून अर्ज दाखल करता येतील. तर दाखल अर्जांची छाननी 3 मे रोजी होणार असून 8 मे रोजी दुपारी 3 पर्यंत माघारीची मुदत असेल. माघारीनंतर लगेचच रिंगणातील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. दि. 18 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान, तर 19 मे रोजी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 24 मेपर्यंत निवडणूक निकालाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्ह्यात सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. तापमानाचा पारा 38 अंशांपर्यंत जाऊन पोहोचल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. त्यातच ग्रामीण भागात पोटनिवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काळात राजकीय आरोप – प्रत्यारोपांमुळे वातावरण अधिकच तापणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ग्रामपंचायतींची रणधुमाळी; 25 एप्रिलपासून अर्ज दाखल प्रक्रिया appeared first on पुढारी.