नाशिक : ग्रामपंचायतींना विनानिविदा कामाची मर्यादा 15 लाख

Illegal money lending

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामपंचायतींना विनानिविदा कामे करण्याच्या मर्यादेबाबत शासनाच्या वित्त विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार ग्रामपंचायतींना आता ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्यात 2019 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर ही मर्यादा 10 लाख रुपये करण्याचा निर्णय झाला होता. यापूर्वी लागू केलेल्या सरकारी निर्णयामुळे ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून मंजूर झालेली कामे विभागनिहाय करायचे असल्यास त्याची मर्यादा नक्की किती रकमेची आहे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून पंधरावा वित्त आयोग, जनसुविधा, नागरी सुविधा आदी कामे ग्रामपंचायतींना मंजूर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीनेच ते काम करण्याची तयारी दर्शविल्यास त्यांना विनानिविदा 15 लाख रुपयांपर्यंतची कामे करता येणार असल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून विनानिविदा व निविदा काढून कामे करण्याच्या मर्यादांमध्ये तीन वेळा बदल झाले होते. याशिवाय अनेक जुने शासकीय निर्णयदेखील लागू केले होते. त्यामुळे ग्रामपंचायतींना विनानिविदा कामे करण्याची मर्यादा किती रकमेची आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम आता शासनाने दूर केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समित्यांनी मंजूर केलेली अथवा ग्रामपंचायतींना स्वनिधीतील कामे विभागनिहाय पद्धतीने करायची असल्यास 15 लाखांपर्यंतची कामे विनानिविदा करता येणार असल्याचे ग्रामविकास विभागाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ग्रामपंचायतींना विनानिविदा कामाची मर्यादा 15 लाख appeared first on पुढारी.