नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल

ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागात प्रचंड उकाडा जाणवत असला तरी केंद्रांवरील मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्यात सुमारे ८० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले असून, मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सदस्यपदाच्या १,२९१ तसेच थेट सरपंचाच्या १७७ जागांसाठी हे मतदान घेण्यात आले. अनेक गावांमध्ये तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. त्यामुळे गावांमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के मतदारांनी थेट सरपंचपदासाठी रिंगणात असलेल्या ५७७ तसेच सदस्यपदाच्या २८९७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केले.

जिल्ह्यातील १४ ही तालक्यांतील ७४५ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी साडेसात ते ९.३० यावेळेत १३.२४ टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीडपर्यंत ५१ टक्के मतदान झाले. मात्र, दीड ते साडेतीन यावेळेत उन्हाचा तडाखा अधिक असल्याने मतदारांनी केंद्राकडे पाठ फिरवली. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना मतदारांसाठी आवाहन केल्याने अखेरच्या २ तासांत मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या.

गावपातळीवर किरकोळ घटना सोडल्यास उर्वरित मतदान शांततेत पार पडल्याने यंत्रणने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, मतदानानंतर प्रत्येक उमेदवाराने त्याच्या विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावरील मतमोजणीनंतर कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार आणि कोणाला पराजयचा धक्का सहन करावा लागणार हे स्पष्ट होईल.

वेळ टक्केवारी

सकाळी ७.३० ते ९.३० १३.२४

सकाळी ९.३० ते ११.३० १५.९६

सकाळी ११.३० ते दीड २१.५२

दुपारी दीड ते ३.३० १७.८९

हेही वाचा :

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान, उद्या निकाल appeared first on पुढारी.