Site icon

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 242 ग्रामपंचायतींमधील 350 रिक्त जागांसाठी व थेट सरंपचपदाच्या सहा पदांकरिता इच्छुकांना मंगळवारपासून (दि.25) अर्ज दाखल करता येणार आहे. या सर्व ठिकाणी 18 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे गावागावांमधील वातावरण तापून निघणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून 34 जिल्ह्यांमधील दोन हजार 620 ग्रामपंचायतींमधील तीन हजार 666 रिक्तपदे तसेच 126 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सदस्यांच्या 350 रिक्त व सहा थेट सरपंचांच्या जागांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या आठवड्यात तहसीलदारांनी तालुकास्तरावर निवडणुकांची आचारसंहिता घोषित केली. तर मंगळवार (दि.25) पासून इच्छुकांना प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्जासाठी 2 मे ही अंतिम मुदत असून, या कालावधीत शासकीय सुटीवगळता अर्ज दाखल करता येईल. दाखल अर्जांची 3 मे रोजी छाननी होणार असून, 8 मे रोजी दुपारी 3 पर्यंत माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. माघारीच्या मुदतीनंतर अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल. तसेच आवश्यक त्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी 18 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान घेण्यात येईल. तसेच 19 तारखेला तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी पार पडेल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 24 मेपर्यंत निकालाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे. त्यामुळे पुढील तीन आठवडे गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया appeared first on पुढारी.

Exit mobile version