Site icon

नाशिक : ग्रामीण रुग्णालयात अवघ्या दोनच खाटा; तरीही गंभीर आजारांचे प्रमाणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिसांच्या बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ज्या खासगी रुग्णालयांनी आजारपणाच्या फाइल्स तयार केल्या आहेत, त्यापैकी एका रुग्णालयात रुग्णांसाठी दोनच खाटा होत्या, तर एक रुग्णालय बंदच असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे खासगी डॉक्टर व जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे लागेबांधे समोर येत असून, पोलिसांनी खासगी रुग्णालये, डॉक्टरांचीही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस दलातील काही कर्मचार्‍यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी कुटुंबातील व्यक्ती आजारी किंवा त्यांच्यावर जोखमीची शस्त्रक्रिया झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले आहेत. हा प्रकार छाननी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपास करून ऑगस्ट महिन्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सुरुवातीला ग्रामीण पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा कनोज यांना अटक केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन कांतीलाल गांगुर्डे याला अटक केली. या बनावट प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करणार्‍या नाशिक व धुळे जिल्हा रुग्णालयांतील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकही संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांपासूनची वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असल्याचे समोर येत आहे. छाननीत 24 प्रमाणपत्रे बनावट आढळली असून, इतरांचा तपास सुरू आहे. कांतीलाल गांगुर्डेला शुक्रवारी (दि. 16) निलंबित केले जाणार आहे. खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर, जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, लिपिक व कर्मचार्‍यांची साखळी या गैरव्यहारात उघडकीस आली आहे. बदलीसाठी खोटे प्रमाणपत्र देण्यासाठी नातलगांची शस्त्रक्रिया झालेली नसतानाही शस्त्रक्रिया झाल्याचे प्रमाणपत्र खासगी डॉक्टरांनी तयार केले. बनावट प्रमाणपत्र असल्याचे माहिती असूनही जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्वाक्षर्‍या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे स्वाक्षर्‍या करणार्‍या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधातही गुन्हा दाखल आहे. दरम्यान, ज्या खासगी रुग्णालयांनी पोलिसांना वैद्यकीय प्रमाणपत्राच्या फाइल दिल्या आहेत, ते रुग्णालय व तेथील डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेची परवानगी नसतानाही तेथे शस्त्रक्रिया झाल्याचे दाखविण्यात आले आहे, तर काही रुग्णालये बंद होती, तरी त्यांनी दाखले दिले आहेत. बहुतांश बनावट प्रमाणपत्रांमध्ये याच रुग्णालयांचा सहभाग आहे.

शस्त्रक्रिया नाही, कागदपत्रेही नाहीत
पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या छाननी समितीतील सदस्यांनी प्रमाणपत्रांची छाननी केली असता, यात शस्त्रक्रियेसंदर्भात बाह्यरुग्ण कक्षाची कागदपत्रे आढळली. मात्र, शस्त्रक्रिया झाल्याची कागदपत्रे जोडली नसल्याने संशय आला. काही प्रकरणांमध्ये दाखल वैद्यकीय प्रमाणपत्रातील शस्त्रक्रिया कोरोना काळात झाल्याचे आढळल्याने याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांकडे विचारणा केली असता, त्यांनी कोरोना काळात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आलेली रुग्णालये तपासली असता, ती एका खोलीची आणि बंद असल्याची आढळली.

प्रमाणपत्रांची छाननी सुरू
पोलिसांनी प्रमाणपत्रांची छाननी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे ज्या पोलिसांचे प्रमाणपत्र बनावट आढळले आहे, त्यांना नोटीस बजावून त्यांचे जबाब घेतले आहेत. संबंधितांवरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे.

चर्चांना उधाण
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. ठाणे ग्रामीण पोलिस दलातीलही काही पोलिसांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बनावट प्रमाणपत्र नेल्याच्या चर्चा आहेत. त्याचप्रमाणे सर्व प्रमाणपत्रांची छाननी केली, तर बहुतांश प्रमाणपत्रे बनावटच निघतील, असाही दावा विविध चर्चांमधून केला जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ग्रामीण रुग्णालयात अवघ्या दोनच खाटा; तरीही गंभीर आजारांचे प्रमाणपत्र appeared first on पुढारी.

Exit mobile version