नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार

महावितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व नगर जिल्ह्यांत सुमारे १ हजार ४०० काेटी रुपये खर्च करून १६ लाखांहून अधिक स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जाणार आहेत. या मीटरमुळे भविष्यात ग्राहकांची वाढीव वीजबिलातून सुटका होईल.

महावितरण आणि वीजबिल हा वाद राज्यातील ग्राहकांसाठी नवीन नाही. दर महिन्याला वाढीव बिलाबाबत हजारो तक्रारी महावितरणकडे प्राप्त होतात. तसेच छापील बिले वेळेत न मिळणेसह अन्य तक्रारींचे स्वरूप कायम असल्याने त्या सोडविताना महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येतात. वाढीव बिलांमुळे ग्राहकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागतो. काही घटनांमध्ये थेट अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाणीच्या घटनाही समोर येत आहेत. पण, लवकरच वीजग्राहक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांची या संकटातून मुक्तता होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून दिवसेंदिवस गतिमान व पारदर्शक कारभारावर भर दिला जातोय. त्याअंतर्गत कंपनीतर्फे राज्यातील २.२ कोटी वीजग्राहकांकडे प्रीपेड ऊर्जा मीटर बसविण्यात येणार आहे. दहा हजार कोटींच्या या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व अन्य वर्गवारीतील वीजमीटर बदलले जाणार आहे. हे सर्व मीटर्स बदलण्यासाठी कंपनीने निविदा काढल्या आहेत. या मीटरमुळे ग्राहकांचे पेड चार्जेस संपेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत राहील. त्यानंतर ग्राहकांना पेड चार्जेस भरून पुन्हा विद्युतपुरवठा सुरळीत करता येईल. दरम्यान, या प्रणालीमुळे महावितरणला कागदी बिलिंग, छपाई, बिलांचे वितरण आणि वसुली प्रक्रियेतून सुटका होणार आहे.

Budget 2023 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला काँग्रेस अध्यक्षांसह, महत्त्वाचे नेते राहणार अनुपस्थित; जयराम रमेश यांची माहिती

नाशिक परिमंडळात महावितरणचे सर्व विभाग मिळून १६ लाखांच्या वर ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांकडे प्रीपेड मीटर बसविले जाणार असून, त्यासाठी अंदाजे 1,400 कोटींचा खर्च येणार आहे. मीटर बसविण्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि कामाचे आदेश जारी झाल्यानंतर वास्तविक किंमत आणि मीटरची संख्या उपलब्ध होईल, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार appeared first on पुढारी.