नाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

घरफोडी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरफोडी करणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने दोन वर्षे तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अजय वाघेला असे घरफोडी करणाऱ्या चोरट्याचे नाव आहे.

देवळाली कॅम्प येथील लॅम रोड परिसरात २६ ते २७ मार्च २०२० या कालावधीत विष्णू संतू खताळे यांच्या घरात चोरट्याने घरफोडी करून ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. पी. हांडोरे यांनी तपास करून अजय वाघेला याच्यासह आणखी एकास अटक करून त्याच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे पी. एस. सपकाळे यांनी युक्तिवाद केला.

साक्षीदारांच्या साक्ष, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अजय याने घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. देशमुख यांनी वाघेला यास घरफोडी केल्याप्रकरणी सश्रम कारावास व दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार किरण बाबूराव गावंडे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post नाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.